दैनिक स्थैर्य । दि. ०९ जुलै २०२२ । पुणे । राज्यातील ९२ नगरपालिकांच्या निवडणुकांचा आज अखेर बिगुल वाजला. राज्यातील पर्जन्यमान कमी असलेल्या 17 जिल्ह्यातील 92 नगरपालिका व चार नगरपंचायतींच्या निवडणुकींचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने नुकताच जाहिर केला. 18 ऑगस्ट रोजी मतदान होणार असून या निवडणूकीची प्रक्रीया 20 जुलैपासून सुरु होणार आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार 20 जुलै रोजी जिल्हाधिकारी निवडणूक कार्यक्रम जाहिर करणार असून लगेच 22 ते 28 जुलैपर्यंत राज्य निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या संकेतस्थळावर नामनिर्देशनपत्र भरायची आहेत. छाननी व वैध नामनिर्देशन पत्र असलेल्या उमेदवारांची यादी 29 जुलै रोजी जाहिर केली जाणार असून 4 ऑगस्ट पर्यंत अर्ज माघारी घेता येणार आहेत. उमेदवारी मागे घेण्यासाठीच्या शेवटच्या दिवसानंतरच्या दिवशी अंतिम यादी प्रसिध्द केली जाणार आहे.
18 ऑगस्ट रोजी मतदान घेतले जाणार आहे. त्यानंतर लगेचच 19 ऑगस्ट रोजी मतमोजणी करुन निकाल जाहिर करण्यात येणार आहेत. अर्ज माघारी घेणे व प्रत्यक्ष मतदान यात 14 दिवसांचा कालावधी असून प्रचारासाठी दोन आठवड्यांचा कालावधी उमेदवारांना मिळणार आहे. यावेळी पहिल्यांदा संकेतस्थळावर उमेदवारी अर्ज दाखल करण्याबाबचा उल्लेख निवडणूक आयोगाने केलेला असल्याने ती एक नवीन बाब ठरणार आहे. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार अंतिम मतदार याद्यांची निश्चिती झालेली असून त्या मतदार याद्यानुसारच आता मतदान प्रक्रीया पार पडणार आहे. दरम्यान सत्ताबदलानंतर नगराध्यक्ष जनतेतून निवडावा अशी भाजपची भूमिका असल्याने राज्य शासन त्या बाबत काय निर्णय घेणार या बाबतही उत्सुकता आहे. मात्र आता निवडणूक आयोगाने हा कार्यक्रम जाहिर केल्याने नगरपालिकांच्या निवडणकांचा बिगुल वाजला आहे.
या 92 नगरपालिकांच्या होणार निवडणूका
“अ” वर्ग नगरपालिका – भुसावळ, बारामती, बार्शी, जालना, बीड व उस्मानाबाद
“ब” वर्ग नगरपालिका – फलटण, मनमाड, सिन्नर, येवला, दोंडाईचा वरवाडे, शिरपूर वरवाडे, शहादा, अंमळनेर, चाळीसगाव, कोपरगाव, संगमनेर, श्रीरामपूर, चाकण, दौंड, कराड, इस्लामपूर, विटा, अक्कलकोट, पंढरपूर, अकलूज, जयसिंगपूर, कन्नड, पैठण, अंबेजोगाई, माजलगाव, परळी वैजनाथ, अहमदपूर, अंजनगाव सुर्जी,
“क” वर्ग नगरपालिका – चांदवड, नांदगाव, सटाणा, भगूर, वरणगाव, धरणागाव, एरंणडोल, फैजपूर, पारोळा, यावल, जामखेड, शेवगाव, देवळाली प्रवरा, पाथर्डी, राहता, राहुरी, राजगुरुनगर, आळंदी, इंदापूर, जेजुरी, सासवड, शिरुर, म्हसवड, रहिमतपूर, वाई, आष्टा, तासगाव, पलूस, मोहोळ, दुधनी, करमाळा, कुर्डुवाडी, मैंदर्गी, मंगळवेढा, सांगोला, गडहिंग्लज, कागल, कुरुंदवाड, मुरगूड, वडगाव, गंगापूर, खुलताबाद, अंबड, भोकरदन, परतूर, गेवराई, किल्लेधारुर, भूम, कळंब, मुरुम, नळदुर्ग, उमरगा, परांडा, तुळजापूर, औसा, निलंगा, दर्यापूर, देउळगावराजा,
नगरपंचायती – नेवासा, मंचर, माळेगाव बुद्रुक, अनगर