
दैनिक स्थैर्य । दि. १० नोव्हेंबर २०२२ । सातारा । माहे ऑक्टोबर २०२२ ते माहे डिसेंबर २०२२ या कालावधीत मुदत संपणाऱ्या व नव्याने स्थापित झालेल्या ३१६ तसेच समर्पित आयोगाच्या अहवालात दिसत नसल्यामुळे मागील निवडणुकांमधुन वगळलेली एक व सन २०२१ मधील सार्वत्रिक निवडणुकीमध्ये एकही नामनिर्देशनपत्र प्राप्त न झाल्यामुळे कार्यकारणी गठीत न झालेल्या दोन अशा एकूण ३१९ ग्रामपंचयातींच्या सदस्य पदांसह थेट सरपंच पदाच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला असल्याचे प्रशांत आवटे उपजिल्हाधिकारी महसूल यांनी कळविले आहे.
सार्वत्रिक निवडणूक जाहीर झाल्यापासून या ग्रामपंचयातींच्या क्षेत्रामध्ये आचारसंहिता लागु राहील. या क्षेत्रातील मतदारांवर प्रभाव टाकणारी कोणतीही कृती, घोषणा मंत्री, खासदार, आमदार व संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेतील पदाधिकाऱ्यांना आचारसंहिता कालावधीत कुठेही करता येणार नाही.
सदरचा निवडणूक कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. तहसिलदारांनी निवडणूक नोटीस प्रसिध्द करण्याचा दिनांक शुक्रवार दि. १८ नोव्हेंबर २०२२. सोमवार दि. २८ नोव्हेंबर ते शुक्रवार दि. २ डिसेंबर २०२२ सकाळी ११ ते दुपारी ३ या कालावधीत नामनिर्देशन पत्रे मागविणे व सादर करणे. अर्जाची छाननी सोमवार दि. ५ डिसेंबर २०२२ रोजी सकाळी ११ वाजल्यापासून छाननी संपेपर्यंत. बुधवार दि. ७ डिसेंबर २०२२ रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्रे मागे घेता येतील. निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा तसेच अंतिमरित्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिध्द करण्याचा दिनांक व वेळ बुधवार दि. ७ डिसेंबर २०२२ दुपारी ३ वा. नंतर. आवश्यकता भासल्यास रविवार दि. १८ डिसेंबर २०२२ रोजी सकाळी ७.३० वा. पासून सांय. ५.३० पर्यंत मतदान होणार आहे. मतमोजणी मंगळवार दि. २० डिसेंबर २०२२ रोजी होईल. तर शुक्रवार दि. २३ डिसेंबर २०२२ पर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत निवडणूकीच्या निकालाची अधिसूचना प्रसिध्द करण्यात येईल.