दैनिक स्थैर्य । दि.१९ नोव्हेंबर २०२१ । फलटण । पंचायत समिती सभापतीपदाचा श्रीमंत शिवरुपराजे खर्डेकर यांनी राजीनामा दिल्यानंतर फलटण पंचायत समितीचे सभापती पद रिक्त झालेले आहे. सदरील सभापती पदाच्या निवडीसाठी प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप यांनी दिनांक २९ नोव्हेंबर २०२१ रोजी पंचायत समितीची विशेष सभा बोलावलेली आहे. या सभेमध्ये फक्त सभापती व उपसभापती यांची निवड केली जाणार आहे.
दिनांक २९ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ ते १२ वाजेपर्यंत सभापती पदाच्या अर्ज भरण्याची मुदत आहे. तर १२ ते १२.१५ वाजेपर्यंत बोलवण्यात आलेली विशेष सभा सुरू करून अर्जाची छाननी करण्यात येणार आहे. तर १२.३० वाजेपर्यंत अर्ज मागे घेण्यात येणार आहेत. १२.३१ च्या पुढे आवश्यक असल्यास मतदान व निकाल जाहीर करण्यात येणार आहे. असा सभापती पदाचा निवडणूक कार्यक्रम प्रांताधिकारी डॉ. शिवाजी जगताप यांनी जाहीर केलेला आहे.
फलटण पंचायत समितीच्या सभापतिपदी युवा नेते श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर यांना संधी द्यावी, अशी मागणी तालुक्यामधून जोर धरू लागली आहे. तरी आगामी काळामध्ये सभापतीपदाची नक्की कोणाच्या गळ्यात पडणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरलेले आहे.
सभापतिपदाच्या सोबतच उपसभापतीपदी फलटण पंचायत समिती मधील कोणत्या सदस्याची वर्णी लागणार आहे, हे सुद्धा पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका लक्षात घेता उपसभापतीपदी नक्की कोणाची निवड करण्यात येणार ? त्यावर पुढील निवडणुकीची बरिचशी गणिते अवलंबून राहणार आहेत. उपसभापतिपदी संजय कापसे, सौ. विजया नाळे व संजय सोडमिसे यांच्या नावाची चर्चा सध्या पंचायत समितीचा राजकीय वर्तुळात सुरू आहे.