दैनिक स्थैर्य । दि. २१ एप्रिल २०२२ । फलटण । राज्यामध्ये जातीय तणावाच्या परिस्थितीत कायदा, सुव्यवस्था, जातीय सलोखा व शांतता राखण्याच्या दृष्टीने जिल्हास्तरीय शांतता समितीची स्थापना पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून करण्यात आलेली आहे. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष मिलिंद नेवसे यांची अस्थायी सदस्यपदी निवड करण्यात आलेली आहे.
याबाबतचे आदेश अप्पर पोलीस अधीक्षक अजित बोर्हाडे यांनी पारित केलेले आहेत.जिल्हास्तरीय शांतता समितीचे अध्यक्ष हे जिल्हाधिकारी आहेत. तर शांतता समितीमध्ये जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, जिल्हा पोलीस अधीक्षक, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, जिल्ह्यातील लोकसभा, राज्यसभा, विधानसभा, विधानपरिषदेचे सदस्य व राज्य अल्पसंख्याक आयोगाचे सदस्य हे स्थायी सदस्य असणार आहेत. अप्पर पोलीस अधीक्षक हे शांतता समितीचे सदस्य सचिव असणार आहेत.
विधानपरिषदेचे सभापती ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, आमदार दीपक चव्हाण, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर व सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली शांतता समितीमध्ये कामकाज करणार आहे, असे मत मिलिंद नेवसे यांनी यावेळी व्यक्त केले.