दैनिक स्थैर्य | दि. १० ऑक्टोबर २०२४ | फलटण |
मुंबई येथे बुधवारी महायुतीच्या बैठकीमध्ये प्रत्येक विधानसभा मतदारसंघांमध्ये महायुतीच्या भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, यांचा प्रत्येकी एक समन्वयक जाहीर करण्यात आला. यावेळी माण-खटाव विधानसभा मतदारसंघ भाजपाकडून समन्वयकपदी जयकुमार शिंदे, शिवसेनेकडून अविनाश सुभेदार, राष्ट्रवादीकडून बाळासाहेब काळे यांची महायुतीच्या बैठकीमध्ये निवड करण्यात आली आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर समन्वय साधण्यासाठी पक्षाने या नेमणुका केलेल्या आहेत. यामध्ये सर्वांशी समन्वय ठेवून एकत्रित निवडणूक कशा पद्धतीने लढता येईल, यासाठी विचारविनिमय करणे, सर्व कार्यकर्ते, नेते यांचा समन्वय निवडणुकीमध्ये ठेवणे, प्रचाराचे नियोजन करणे, निवडणुकीची रणनीती ठरवण्यासाठी ही निवड करण्यात आलेली आहे. मतदारसंघातील छोट्या-मोठ्या गोष्टींमध्ये मतभेद होणार नाही याची काळजी जयकुमार शिंदे यांना घ्यावी लागणार आहे व महायुतीचा उमेदवार जास्तीत जास्त मताने निवडून येण्यासाठी प्रयत्न करायचा आहे.
या निवडीबद्दल महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार जयकुमार गोरे, जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम या सर्वांनी जयकुमार शिंदे यांचे अभिनंदन केले आहे.