दैनिक स्थैर्य | दि. २८ ऑक्टोबर २०२४ | फलटण | फलटण तालुक्यात शेजारी असणाऱ्या बारामतीचे फलटण तालुक्याचे जुने ऋणानुबंध आहेत. बारामती सारखा विकास करायचा असेल तर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघांमधून निवडणूक लढवत असलेले सचिन पाटील यांना फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघांमध्ये जनतेने निवडून पाठवावे; असे आवाहन राज्यसभा खासदार नितीनकाका पाटील यांनी केले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघांमधून सचिन सुधाकर पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी राज्यसभा खासदार नितीनकाका पाटील, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, नवनिर्वाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोळसकर, ज्येष्ठ नेते प्रल्हाद साळुंखे – पाटील, जिल्हा बँकेचे संचालक श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर, कृष्णा खोरे महामंडळाचे संचालक माणिकराव सोनवलकर, फलटण तालुका शिवसेनाप्रमुख नानासाहेब इवरे यांच्यासह मान्यवरांचे उपस्थिती होती.
ते नेते सुद्धा राष्ट्रवादीचा प्रचार करतील : खासदार पाटील
यावेळी बोलताना खासदार पाटील म्हणाले की; फलटण तालुक्यासह सातारा जिल्ह्यामधील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्वच पदाधिकाऱ्यांना महायुतीचे कामकाज करावे लागणार आहे. याबाबत आमचे नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी स्पष्ट निर्देश दिलेले आहेत. येणाऱ्या काही दिवसांमध्ये जे कोणी नेते प्रचार करताना दिसणार नाही ते सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रचाराला लागतील असा मला विश्वास आहे.
सचिन पाटील आमदार होणारच : माजी खासदार रणजितसिंह
फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघांमधून महायुतीच्या माध्यमातून ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला गेली असल्याने सचिन पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या तिकिटावर विधानसभा निवडणूक लढवत आहेत. फलटण तालुक्यातील जनतेला आता बदल हवा असल्याने फलटणकर जनता नक्कीच सचिन पाटील यांना भरघोस मताने निवडून देतील. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून फलटणची जागा महायुती नक्कीच जिंकेल; असे मत यावेळी माजी खासदार रणजितसिंह यांनी व्यक्त केले.
नीरा देवधरचे काम शरद पवारांनी रखडवले : माजी खासदार रणजितसिंह
माढा लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व हे शरद पवार साहेबांनी केलेले होते. निरा देवधर प्रकल्प पूर्ण न करून देण्यामागे शरद पवारांचा हात होता; हे मी यापूर्वी सुद्धा अनेक वेळा सांगितलेले आहे. महायुतीच्या माध्यमातून विद्यमान आमदार हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा असल्याने फलटणची जागाही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडे गेलेली आहे. परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व भारतीय जनता पार्टी महायुतीमध्ये एकत्रित असल्याने आम्ही सर्व ताकतीने निवडणूक लढवत आहोत. निवडणूक झाल्यानंतर येणाऱ्या सहा महिन्यांमध्ये निरादेवधरचे पाणी आंदरुड पर्यंत पोहोचण्याच्या कामाचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून होणार असल्याची माहिती सुद्धा यावेळी माजी खासदार रणजितसिंह यांनी दिली.
अजितदादा त्यांना योग्य तो सल्ला देतील : बाळासाहेब सोळसकर
फलटणसह कोरेगाव तालुक्यातील जनतेला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व घड्याळ हे चिन्ह काही वेगळे नाही. सर्वसामान्य नागरिकांच्या मनामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीसह घड्याळ हे चिन्ह रुजलेले आहे. यासोबतच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या कामाची पद्धत बघता सर्वसामान्य नागरिक सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सोबतच खंबीरपणे उभा आहे. यासह येणाऱ्या काही दिवसांमध्ये राजकारणामध्ये अनेक उलथापालथी होण्याच्या शक्यता आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये असून सुद्धा जे प्रचारामध्ये सक्रिय नाहीत अशांना उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे योग्य तो सल्ला देतील; असे मत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोळसकर यांनी व्यक्त केले.
फलटण तालुका परिवर्तनाच्या उंबरठ्यावर श्रीमंत शिवरूपराजे
लोकसभा निवडणुकीच्या वेळी शरद पवार साहेबांची मोठ्या प्रमाणावर लाट महाराष्ट्रप्रमाणे फलटण तालुक्यामध्ये सुद्धा होती. परंतु संघर्षाच्या काळामध्ये ज्यांनी पवार साहेबांची साथ सोडली अशा राजे गटाला पवार साहेबांनी पुन्हा सोबत घेतल्यामुळे फलटणच्या जनतेमध्ये प्रचंड प्रमाणात रोष निर्माण झालेला आहे. यामुळे राजे गट व पवार साहेबांच्या सोबत फलटणची जनता राहील की नाही हे सांगता येणार नाही. याउलट उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघांमध्ये एक नावा चेहरा म्हणून सचिन पाटील यांची उमेदवारी घोषित करून त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलेला आहे. फलटण तालुका हा परिवर्तनाच्या उंबरठ्यावर असून नक्कीच सचिन पाटील हे आमदार म्हणून निवडून येतील; असा विश्वास यावेळी सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक श्रीमंत शिवरूप राजे खर्डेकर यांनी व्यक्त केला.
रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद
महायुतीच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अधिकृत उमेदवार म्हणून सचिन सुधाकर पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी फलटण येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून रॅली काढत शक्तिप्रदर्शन करण्यात आले होते. यावेळी धनगरी परंपरेचे देखावा देणारे गजी नृत्य सुद्धा या ठिकाणी ठेवण्यात आले होते. यासोबतच भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व शिवसेनेच्या माध्यमातून आयोजित रॅलीला उस्फूर्त असा प्रतिसाद मिळालेला आहे.