दैनिक स्थैर्य | दि. १२ नोव्हेंबर २०२४ | फलटण |
फलटण विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार दीपक चव्हाण यांनी आतापर्यंत श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्याबरोबर विधानसभेमध्ये फलटण तालुक्याच्या विधायक विकासासाठी खूप चांगले काम केले आहे. त्यामुळेच त्यांना चौथ्यांदा याच मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. तेव्हा त्यांना प्रचंड बहुमताने निवडून देऊन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे सर्वेसर्वा खा. शरद पवार यांचे हात बळकट करा, असे आवाहन खा. धैर्यशील मोहिते-पाटील यांनी कोळकी येथील प्रचारसभेत केले.
माढा लोकसभेचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत कोळकी (फलटण) येथे घोंगडी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी बोलताना धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले की, महाविकास आघाडीने आपल्या विधायक विकासाचा व राज्याच्या उन्नतीचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. त्यामध्ये त्यांनी पहिल्या शंभर दिवसाचा पंचसूत्री कार्यक्रम प्रसिद्ध केला आहे. त्यात प्रामुख्याने सर्व माता-भगिनींसाठी महिन्याला चार हजार रुपयांचे अनुदान राशी देण्याची तरतूद करण्यात आली आहे. तसेच संपूर्ण महाराष्ट्रभर एसटीने ही प्रवास मोफत करण्याचे जाहीर केले आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार आल्या आल्या या दोन्ही गोष्टी देण्याचे महाविकास आघाडीने निश्चित केले आहे. शेतकर्यांसाठी वेळेत कर्ज परत करणार्या शेतकर्यांसाठी पन्नास हजार वार्षिक अनुदान देण्यात येणार आहे. तर तीन लाखापर्यंतचे कर्ज माफ करण्याचे ठरवले आहे. आपल्या राज्यातील सर्वच नागरिकांच्या आरोग्यासाठी त्यांचा २५ लाखांपर्यंत आरोग्य विमा उतरवण्याचे महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यामध्ये निश्चित केले आहे. मुलींसाठी अठरा वर्षे पूर्ण झाल्यानंतर एक लाख रुपये देण्याची योजनेत समाविष्ट करण्यात आले आहे. या व अशा अनेक कल्याणकारी योजना महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यामध्ये देण्यात आल्या आहेत.
राज्यात महायुतीच्या सरकारने प्रशासकीय यंत्रणेला हाताशी धरून चुकीची कामे करण्याचा सपाटा लावला आहे. महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून दडपशाहीने, हुकूमशाहीने कामे केली जात आहेत. संपूर्ण राज्यामध्ये या सर्व गोष्टींचा अनुभव फलटणकर जनतेने घेतला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेमधील जिल्हा परिषद, पंचायत समिती, तहसील कार्यालय प्रांत कार्यालय, पोलीस स्टेशन या सर्व ठिकाणी हुकूमशाहीच्या माध्यमातून व दडपशाहीच्या माध्यमातून लोकांना त्रास देणे सुरू आहे. मुंबईसारख्या महानगरामध्ये माता-भगिनींचे संरक्षण करण्याऐवजी गुन्हा करणार्यांना संरक्षण देण्यात आले आहे. महायुतीच्या काळात लोकप्रतिनिधीच पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार करायला लागले आहेत. अशाप्रकारे गुन्हेगारी प्रवृत्तीला प्रोत्साहन देण्याचं काम या सरकारकडून झाले आहे. महायुतीच्या काळात भ्रष्टाचार तर शिगेला पोहोचला आहे. आपल्या सर्वांना माहीत असेल, पुण्याजवळचा जो बायपास होता तो बायपास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे राष्ट्रीय महामार्गाच्या माध्यमातून ३ हजार कोटींमध्ये करून देणार होते. मात्र, या भ्रष्ट सरकारने या अधिवेशनापूर्वी याच कामाचे राज्य बांधकाम विभागाने २० हजार कोटींचे टेंडर काढले आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर जर भ्रष्टाचार वाढला तरी इतर विकासकामे कशी होतील? एक दिवस पूर्ण राज्यात कर्जबाजारी होऊन जाईल. मागील काही दिवसांमध्ये पंतप्रधानांचे आर्थिक सल्लागार मंडळाने एक आकडेवारी प्रसिद्ध केले असून त्यामध्ये मागील दहा वर्षात महाराष्ट्राचे दरडोई उत्पन्न ७ ते ८ टक्क्यांनी खाली आले आहे. आपल्या राज्यापेक्षा छोटी राज्य जी आहेत ज्यामध्ये तेलंगाना, आंध्र प्रदेश, तमिळनाडू, गुजरात यांचे दरडोई उत्पन्न हे देशाच्या दरडोई उत्पन्नापेक्षा चांगले झाले आहे. या राज्याने किती प्रगती केली आहे, हे यावरून आपल्याला दिसून येत आहे. एकेकाळी आपण अभिमानाने सांगायचो की, महाराष्ट्र हे देशाची आर्थिक राजधानी असून हे देशातील एक नंबरचे राज्य आहे. महाराष्ट्र देशाची आर्थिक राजधानी असल्याने येथे अनेक उद्योगधंदे येत असून औद्योगिक विकास हा झपाट्याने होत आला आहे. मात्र, गेल्या दहा वर्षांमध्ये या ठिकाणी येणार्या उद्योगधंद्यांना हव्या त्या सुविधा न देता या उद्योगधंद्यांना व त्यांच्या प्रमुखांना दमदाटी करून ते इथून पळून कसे जातील, हे पाहिलं जात आहे, असे धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले.
पुढे बोलताना धैर्यशील मोहिते-पाटील म्हणाले की, फलटण शहरामध्ये मोठ्या इमारती उभ्या करत असताना इथल्या बिल्डर्स लोकांना दम देऊन त्यांच्याकडून हप्ते वसूल केले जात आहेत. त्यांना दहशतीखाली काम करावे लागत आहे. त्यामुळे इथून पुढे फलटणमध्ये व्यवसाय करावा की नाही, हा प्रश्न या बिल्डरांच्या मनामध्ये निर्माण झाला आहे. राज्याचे नेतृत्व करणारे नेते यांनी साखरवाडीमध्ये इथल्या दोन कारखान्यांवर व महाराजांवर टीका केली. महाराष्ट्र राज्यात स्वर्गीय यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, श्रीमंत मालोजीराजे नाईक निंबाळकर, आमचे आजोबा शंकरराव मोहिते पाटील, तात्यासाहेब कोरे असतील या सर्वांनी सहकारातून अनेक संस्था उद्या करून राज्याच्या विधायक विकासाला गती देण्याचं काम केलं. जुन्या पिढीनेही त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून त्याला ऊर्जितावस्था आणण्यासाठी प्रयत्न केला. त्यांनी खाजगीकरणाला विरोध करून सहकार क्षेत्राला पुढे आणण्याचं काम केलं. पण आज सहकार क्षेत्राची अवस्था आपण पाहतोय. हे सगळं थांबून महाराष्ट्राला पुन्हा एकदा अव्वल आणायचे असेल तर महाविकास आघाडीचे सरकार आपल्या सगळ्यांना पुन्हा सत्तेत आणावं लागेल. तेव्हा महायुतीला नेस्तानाबूत करण्यासाठी आपल्या सर्वांना येणार्या विधानसभा निवडणुकीमध्ये विद्यमान आमदार दीपक चव्हाण यांना प्रचंड बहुमताने निवडून आणावा लागेल.
श्रीमंत रामराजेंच्या मार्गदर्शनाखाली ‘तुतारी वाजवणारा माणूस’ या चिन्हासमोरील बटन दाबून दीपक चव्हाण यांना प्रंचड बहुमताने निवडून देऊन देशाचे नेते, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे हात बळकट करायचे आवाहन मी आपणा सर्वांना करत आहे, असेही धैर्यशील मोहिते-पाटील शेवटी म्हणाले.
यावेळी महाविकास आघाडीचे सर्व प्रमुख नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.