दैनिक स्थैर्य । दि. २५ फेब्रुवारी २०२२ । सातारा । सांडवली, ता. सातारा गावच्या हद्दीत आज सकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास शेतामध्ये गेलेल्या एकावर अस्वलाने हल्ला केल्याने त्यात ते गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर येथील जिल्हा रुग्णालयात उपचार करून पुढील उपचारासाठी त्यांना सातारा येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सिताराम सखाराम मोरे, वय ६०, रा. सांडवली, ता. सातारा असे त्यांचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, सांडवली, ता. सातारा हा डोंगरी व दुर्गम भाग असून या ठिकाणी सध्या गव्हाचे पीक घेतले जाते. पहाटेच्या सुमारास माकडे गव्हाच्या शेतीचे नुकसान करत असल्याने सांडवली येथील सिताराम सखाराम मोरे, वय ६० हे आज गुरुवार दि. २४ फेब्रुवारी रोजी पहाटे साडेसहा वाजण्याच्या सुमारास शेतामधील माकडे हुसकावण्यासाठी गेले होते. घरी परत येत असताना सांडवली गावच्या हद्दीत असणार्या झऱ्याचे वावर शिवारामध्ये त्यांच्यावर अचानक एका अस्वलाने हल्ला केला. अचानक घडलेल्या घटनेमुळे ते थोडे भांबावून गेले मात्र वेळीच स्वतःला सावरत त्यांनी अस्वलाशी दोन हात केले. या झटापटीमध्ये त्यांच्या चेहऱ्यावर गंभीर जखमा झाल्या. अस्वलाच्या तावडीतून सुटून ते पळत गावाच्या दिशेने आले. घरासमोर आल्यानंतर ते निपचीत पडले. घटनेचे गांभीर्य ओळखून ग्रामस्थांनी परळी प्राथमिक केंद्रातील १०८ रुग्णवाहिका चालक अमोल चव्हाण, रा. महागाव, ता. सातारा यांना या घटनेची माहिती दिली. ते तात्काळ सांडवलीकडे रवाना झाले, मात्र परळी ते सांडवली हे अंतर जास्त असल्यामुळे ग्रामस्थांनी जखमी झालेल्या सिताराम मोरे यांना एका खाजगी गाडीतून पळसावडे येथे घेऊन आले. तोपर्यंत १०८ रुग्णवाहिका पळसावडे येथे दाखल झाली. सिताराम मोरे यांना तात्काळ रुग्णवाहिकेतून सातारा येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
या घटनेची माहिती समजताच जावली तालुका वन्यजीव विभागाचे आरएफओ बाळकृष्ण हसबनीस, पळसावडे येथील वनरक्षक ए. पी. माने, देऊर येथील वनरक्षक सोरट, सांडवली येथील सरपंच गणेश चव्हाण यांनी तत्काळ जिल्हा रुग्णालयात धाव घेतली. सिताराम मोरे यांना गंभीर जखमा झाल्यामुळे त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी सातारा येथील एका खासगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे.