माझ्यावरील टीकेला कामातूनच उत्तर; आवश्यक तिथे ‘बांबू’ही लावतो : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे


दौलतनगर (सातारा) येथील कोयना दौलत डोंगरी महोत्सवाच्या सांगता प्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांचा खरपूस समाचार घेतला. तसेच, पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी जि.प. निवडणुकीतील नाराजी बोलून दाखवली.

स्थैर्य, दौलतनगर (पाटण), दि. ७ एप्रिल : “मी गावी आल्यावर माझ्यावर टीका केली जाते. काहींच्या पोटात दुखते. मात्र, मी त्या टीकेला माझ्या कामातून उत्तर देतो. जिल्ह्यात आठ हजार शेतकऱ्यांनी बांबू लागवडीस संमती दर्शवली असून, मी स्वतःही बांबू लागवड केली आहे. आणि हो, जेथे आवश्यक आहे, तेथे मी बांबूही लावतो!” असा मिश्किल आणि जोरदार टोला राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना लगावला.

दौलतनगर (ता. पाटण) येथील कोयना दौलत डोंगरी महोत्सवाच्या सांगता समारंभाप्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई उपस्थित होते.

‘मी साताऱ्याचा सामान्य शेतकरी पुत्र’

यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री शिंदे यांनी आपली शेतीची आवड आणि विरोधकांच्या टीकेचा समाचार घेतला.

“मी जरी राज्याचा उपमुख्यमंत्री असलो, तरी शेवटी साताऱ्याचा एक सामान्य शेतकरी पुत्र आणि कार्यकर्ता आहे. मी गावात आल्यावर जनता दरबार भरतो आणि त्यानंतर माझे पाय आपोआप शेतीकडे वळतात, हात शेतातील मातीत जातात. मी गावी आल्यावर ‘शेती करण्यासाठी हेलिकॉप्टरने जातात’ अशी टीका विरोधक करतात. काहींच्या पोटातही दुखते. मात्र, मी टीकेला उत्तर देत नाही, तर माझ्या कामातूनच त्यांना उत्तर देतो.”

शंभूराज देसाईंची जि.प. बाबतची खदखद चव्हाट्यावर

सातारा जिल्हा परिषदेत बहुमत असतानाही राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेला (शिंदे गट) सत्ता स्थापन करता आली नाही. भाजपने नाट्यमय घडामोडी घडवून अध्यक्ष आणि उपाध्यक्षपद स्वतःकडे खेचून घेतले. याचे शल्य पालकमंत्री शंभूराज देसाई आणि मंत्री मकरंद पाटील यांच्या मनात कायम आहे.

या महोत्सवाच्या सांगता कार्यक्रमावेळी मंत्री शंभूराज देसाई यांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांच्यासमोरच आपली खदखद उघडपणे व्यक्त केली. देसाई म्हणाले की, “जिल्ह्यात शिवसेनेचे केवळ तीन सदस्य असताना आम्ही आता १५ जिल्हा परिषद सदस्य केले आहेत. जिल्ह्यात शिवसेना ताकदीने वाढत आहे.” हे सांगत असतानाच भाजपच्या खेळीबाबतची त्यांची नाराजी लपून राहिली नाही.


Back to top button
Don`t copy text!