
श्रीमंत अनिकेतराजे आणि नवनिर्वाचित नगरसेवकांनी घेतली एकनाथ शिंदे यांची भेट; राजकीय पाठबळ देण्याचा शब्द.
स्थैर्य, फलटण, दि. २७ डिसेंबर : “शिवसेना कार्यकर्त्यांच्या पाठीशी आणि फलटणच्या विकासासाठी आम्ही सर्व ताकदीनिशी ठामपणे उभे आहोत,” अशी खंबीर ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री ना. एकनाथ शिंदे यांनी दिली.
फलटण नगरपरिषदेच्या निवडणुकीनंतर युवानेते श्रीमंत अनिकेतराजे नाईक-निंबाळकर यांनी आज (शनिवारी) आपल्या नवनिर्वाचित नगरसेवकांसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान शिंदे यांनी फलटणमधील स्थितीचा आढावा घेत कार्यकर्त्यांना आश्वस्त केले.
फलटण नगरपरिषदेच्या निवडणुकीत राजे गटाला (शिवसेना) अपेक्षित यश मिळाले नसले, तरी पक्षनेतृत्व मात्र स्थानिक नेतृत्वाच्या पाठीशी खंबीर असल्याचे या भेटीतून दिसून आले. श्रीमंत अनिकेतराजे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी शिंदे यांनी फलटण नगरपरिषद तसेच शिवसेनेचे नवनिर्वाचित नगरसेवक आणि कार्यकर्त्यांच्या पाठीशी सरकार आणि पक्ष संघटना पूर्ण ताकदीने उभी राहील, असा विश्वास व्यक्त केला.
या महत्त्वपूर्ण भेटीवेळी सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक-निंबाळकर, फलटण पंचायत समितीचे माजी सभापती श्रीमंत विश्वजितराजे नाईक-निंबाळकर यांच्यासह शिवसेनेचे नवनिर्वाचित नगरसेवक आणि प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

