मुधोजी हायस्कूलमध्ये ‘एक राखी सैनिकांसाठी’ उपक्रम; आजी-माजी सैनिकांचा सन्मान

विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेल्या राख्या बांधून व्यक्त केला कृतज्ञता भाव


स्थैर्य, फलटण, दि. ०७ ऑगस्ट : फलटण एज्युकेशन सोसायटीच्या मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये रक्षाबंधनाचे औचित्य साधून ‘एक राखी सैनिकांसाठी’ हा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला. या कार्यक्रमासाठी विद्यालयाने विशेष निमंत्रण देऊन बोलावलेल्या पंधरा आजी-माजी सैनिक बांधवांचा सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रमुख अतिथींचे स्वागत स्वागतगीताने करण्यात आले. यावेळी प्रशालेचे प्राचार्य वसंतराव शेडगे यांनी आपल्या मनोगतातून, सैनिकांच्या देशप्रेमामुळेच देशातील नागरिक सुरक्षित आहेत, अशी कृतज्ञता व्यक्त केली. त्यांच्या प्रती आदर व्यक्त करण्यासाठी हा उपक्रम असल्याचे त्यांनी सांगितले. देशसेवेसारखे दुसरे महान कार्य नाही, असे मत माजी प्राचार्य सुधीर अहिवळे यांनी व्यक्त केले. तोफखाना हवालदार सुरेश मुळीक यांनीही आपले अनुभव कथन केले.

यावेळी विद्यार्थिनी स्वरा गोडसे हिने सैनिकांना लिहिलेल्या पत्राचे वाचन केले, तर आरोही शेडगे या विद्यार्थिनीने देशभक्तीपर गीत सादर केले. कला शिक्षक बापूराव सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेल्या राख्या औक्षण करून सैनिक बांधवांच्या हातावर बांधल्या. दरवर्षीप्रमाणे या राख्या सीमेवरील सैनिकांना पोहोचवण्याची जबाबदारी शिवभक्त परिवाराचे वैभव गोडसे यांनी स्वीकारली. या उपक्रमाची मूळ संकल्पना चित्रकला विभाग प्रमुख बापूराव सूर्यवंशी यांची होती.

या कार्यक्रमास एयरफोर्स सार्जेंट ज्ञानदेव नाळे, इंजिनियर हवालदार तानाजी साळुंखे, तोफखाना हवालदार बाळासो घाडगे, सिग्नल कोर नाईक सुरेश मुळीक, माणिकराव खलाटे, इंजिनिअर नाईक सदाशिव केंजळे, मेकॅनिक रामू जाधव, सिग्नल कोर नाईक कैलास ठणके, नाईक दत्तात्रय फडतरे, दीपक संकपाळ, सुभेदार दिलीप भिसे, नायब सुभेदार चव्हाण आणि ज्युनियर कॉलेजचे उपप्राचार्य सोमनाथ माने आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय गोफणे यांनी केले, पाहुण्यांचा परिचय पर्यवेक्षक राजेंद्र नाळे यांनी करून दिला तर आभार प्रदर्शन पर्यवेक्षक रावसाहेब निंबाळकर यांनी केले. अनिल यादव, संजय गोफणे, चेतन बोबडे, प्रीतम लोंढे, सुधाकर वाकुडकर, अभिजीत माळवदे, रमाकांत क्षीरसागर आणि सौ. वनिता लोणकर यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.


Back to top button
Don`t copy text!