
दैनिक स्थैर्य | दि. १७ नोव्हेंबर २०२३ | फलटण |
‘वायएलटीपी’ मित्र परिवार आणि गोखळी ग्रामस्थ यांच्या संयुक्त सहभागातून दिवाळी सणाच्या निमित्ताने ‘एक हात मदतीचा’ या उपक्रमांतर्गत दरवर्षी घेतला जाणारा उपक्रम कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन सांगवी आश्रमशाळेचे प्राचार्य गणपत निवृत्ती नाळे सर यांनी केले.
फलटण तालुक्याच्या पूर्वभागातील सांगवी (मायनर) प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य, खाऊ आणि पाणी गरम करण्याचा विद्युत संच (गिझर) भेट देण्यात आले.
यावेळी रमेशदादा गावडे यांनी या उपक्रमाचा सविस्तर आढावा घेतला. गेल्या दोन वर्षांपासून घेताना ‘वायएलटीपी’ मित्र मंडळ आणि गोखळी ग्रामस्थांच्या वतीने प्रत्येक दिवाळीच्या पार्श्वभूमीवर समाजातील गरजू विद्यार्थ्यांना आणि सामाजिक संस्थांना ‘एक हात मदतीचा’ या उपक्रमाअंतर्गत संबंधितांशी चर्चा करून त्यांना आवश्यक वस्तू, साहित्य स्वरूपात मदत ग्रामस्थांच्या आर्थिक सहकार्यातून गेली तीन वर्षे करण्यात येते. दोन वर्षांपूर्वी बोरी, ता. इंदापूर येथील अनाथाश्रमास शेळी, कुक्कुटपालन शेड उभारणीसाठी मदत, गेल्या वर्षी हणमंतवाडी येथील संत तुकोबाराय वारकरी शिक्षण संस्था यांना ग्रंथ वाटप, यावर्षी सांगवी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले, असे सांगितले.
यावेळी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या परीक्षेत ‘कृषी मंडलाधिकारी’ पदी निवड झाल्याबद्दल सूरज जितेंद्र गावडे यांचा मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पहार देऊन सन्मानित करण्यात आले. प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा सांगवी (मायनर) शाळेचे प्राचार्य नाळे सर यांच्याकडे शालेय साहित्य मान्यवरांच्या हस्ते वितरीत करण्यात आले.
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रहारचे फलटण तालुकाध्यक्ष सागर गावडे, प्रसाद जाधव, किरण हरिहर, श्रीकांत गावडे, चांगदेव शिरतोडे, ‘वायएलटीपी’ मित्र मंडळ आणि गोखळी ग्रामस्थ यांचे विशेष सहकार्य लाभले.
सामाजिक कार्यकर्ते राधेश्याम जाधव यांनी सूत्रसंचालन केले.
मनोज तात्या गावडे, नंदूमामा गावडे, पोलीस उपनिरीक्षक रूपेश भागवत यांच्या विशेष मार्गदर्शनातून हा कार्यक्रम चिरंतन व यशस्वीपणे चालू राहील, असे प्रतिपादन करत प्रमोद गेजगे यांनी आभार मानले.