दैनिक स्थैर्य । दि. ०६ डिसेंबर २०२१ । सातारा । माण तालुक्यातील मोगराळे घाट येथे सातारा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आठ किलो गांजा आणि एक चारचाकी असा नऊ लाख ८४ हजारांचा गांजा जप्त केला आहे. या प्रकरणी पिलीव येथील दोघांना अटक करण्यात आली असून दोन संशयितांना अटक करण्यात आली असून रणजित लक्ष्मण जाधव, लक्ष्मण रामू जाधव (रा. पिलीव, ता. माळशिरस, जि. सोलापूर) अशी त्यांची नावे आहेत. याप्रकरणी दहिवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी की, माण तालुक्यातील मोगराळे घाटातून गांजाची वाहतूक होणार असल्याची माहिती सातारा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांना दि. २४ नोव्हेंबर रोजी मिळाली होती. यानुसार त्यांनी एलसीबीचे सहायक पोलीस निरीक्षक आनंदसिंग साबळे यांना कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या होत्या. त्यानुसार आनंदसिंग साबळे आणि त्यांच्या टीमने सापळा रचला होता.
एलसीबीच्या टीमने मोगराळे घाटात नाकाबंदी केल्यानंतर वाहनांची तपासणी सुरु होती. या पथकाला एक चारचाकी (एमएच ४५ – एडी ५११०) आढळून आली. त्या गाडीतून उग्र वास येत असल्याचे लक्षात आले. या गाडीची पाहणी केली असतान गाडीत गांजा असल्याचे निदर्शनास आले. यानंतर पोलिसांना चारचाकीतील दोघांना ताब्यात घेतले असता त्यांनी आपली नावे रणजित लक्ष्मण जाधव, लक्ष्मण रामू जाधव अशी सांगितली. दरम्यान, याची माहिती पोलीस उपधीक्षक डॉ. निलेश देशमुख यांना देण्यात आली. यावेळी पोलिसांनी एक लाख ६१ हजार ६८० रुपयांचा ८.०८४ किलो गांजा आणि रोकड, चार चाकी तसेच दोन मोबाईल असा नऊ लाख ८४ हजार ६८० रुपयांचा ऐवज जप्त केला. याप्रकरणी रणजित जाधव, लक्ष्मण जाधव या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना तत्काळ अटक करत दहिवडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
या कारवाईत हवालदार साबीर मुल्ला, लक्ष्मण जगधने, अर्जुन शिरतोडे, अमोल माने, शिवाजी भिसे, अमित सपकाळ, प्रमोद सावंत, स्वप्नील माने, गणेश कापरे, मोसीन मोमीन, मयूर देशमुख, सचिन ससाणे, वैभव सावंत, प्रवीण पवार, शिवाजी गुरव, दहिवडी पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक मुल्ला, हवालदार हांगे, पवार, वाघमारे दहिवडी उपविभागीय कार्यालयातील राम तांबे सहभागी झाले होते.