
स्थैर्य, खटाव, दि. 24 : देशावर करोना चे आलेले संकट पाहता यंदा खटावमधील सर्व मुस्लीम बांधवांनी साध्या पद्धतीने रमजान ईद साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे. याबरोबरच ईद निमित्त नेहमी केली जाणारी खरेदी न करता सर्व जाती धर्मातील गोरगरीब, गरजू यांना मदत करावी, असे आवाहन सुन्नतुल मुस्लिम जमातचे चेअरमन शमशुद्दीन मुल्ला यांनी मुस्लीम बांधवांना केले आहे. याशिवाय लॉकडाऊनचे उल्लंघन करू नये. शासनाने लागू केलेले सर्व नियम तंतोतंत पाळावे असे ही आवाहन चेअरमन यांनी केले आहे. त्यांनी केलेल्या आवाहनाला खतावमधील सर्व मुस्लीम बांधवांनी उस्फूर्त प्रतिसाद देत यंदा ईद साध्या पद्धतीने साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे. खतावमधील दोन्ही मशिदीच्या गेटसमोर ईद साध्या पद्धतीने साजरी करावी, असे बोर्ड देखील लावण्यात आलेले आहेत.
इस्लाम धर्मात पवित्र रमजान महिन्याला एक आगळेवेगळे महत्व आणि स्थान आहे. त्यामुळे जगभरातील मुस्लीम बांधव या महिन्याची आतुरतेने वाट पाहत असतात. या महिन्यात रोज पाच वेळा नियमीतपणे अदा केली जाणार्या नमाज व्यतिरिक्त तरावीहची विशेष नमाज देखील अदा केली जाते. शिवाय संपूर्ण महिना रोजे केले जातात त्यासाठी पहाटे सहेरी केली जाते. तर सायंकाळी सूर्य मावळल्यानंतर रोजा इफ्तार केला जातो. रमजान महिना सुरु होताच गावखेडा असो अथवा मोठे शहर सर्व ठिकाणी मशिदीमध्ये मुस्लीम बांधवांची मोठी गर्दी असते. शिवाय या महिन्यात जकात आणि फित्रा देखील मोठ्या प्रमाणात दिला जातो. मात्र यंदा देश आणि जगावर करोना चे संकट आल्यामुळे लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. त्याचे तंतोतंत पालन केले जात असल्याने खटावमधील सर्व मुस्लीम बांधव हे आपापल्या घरात नमाज, रोजा इफ्तार करून नमाज अदा करत आहेत.
रमजान महिना पूर्ण होत आला असून उद्याच्या दिवशी ईद येवून ठेपली आहे. मात्र कोरोनाचे संकट अजून ही देशावर कायम आहे. त्यामुळे यंदा रमजान ईद साध्या पद्धतीने साजरी करावी, असे आवाहन चेअरमन शमशुद्दीन मुल्ला यांनी केले आहे.
करोनामुळे दोन महिन्यांपासून लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे हातावर पोट असलेल्या सर्व जातीधर्मांच्या लोकावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे सर्वांनी ईद निमित्त कोणतीही नवीन वस्तू खरेदी न करता या गोरगरिबांची मदत करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. त्यांच्या या आवाहनाला खतावमधील मुस्लीम बांधवांकडून उस्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
आम्ही भारतीय मुस्लिम असल्याचा आम्हाला अभिमान आहे. देशावर आलेले संकट हे दुर्दैवी आहे. आम्ही देखील सरकारसोबत आहोत. करोना मुळे आमच्या हिंदू बांधवांनी रामनवमी, हनुमान जयंती, गुढीपाडवा, जैन बांधवांची महावीर जयंती, भीम सैनिकांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती साध्या पद्धतीने साजरी केली. मग आम्ही ईद धुमधडाक्यात कशी साजरी करू शकतो. आम्ही देखील या देशाचे केवळ नागरिक नव्हे तर देशभक्त नागरिक आहोत. भारतातील कोणताही मुस्लिम शासनाच्या निर्णयाविरोधात जाणार नाही. यावर्षी आम्ही ईद अगदी साधेपणाने साजरी करणार आहोत, असेही चेअरमन शमशुद्दीन मुल्ला यांनी सांगितले आहे.