श्रीराम कारखाना अडचणीत आणण्याचा प्रयत्न यशस्वी होणार नाही : श्रीमंत संजीवराजे


दैनिक स्थैर्य । दि. ०८ जून २०२३ । फलटण । फलटण तालुक्यात ऊसाचे क्षेत्र वाढत असले तरी सर्व ४ ही साखर कारखान्यांनी आपली गाळप क्षमता वाढविली असल्याने स्पर्धा आणि त्यातून एकमेकांना टार्गेट करुन अडचणीत आणण्याचा प्रयत्न सुरु असल्याचे सांगत कोरेगाव, सातारा, वाई येथील कारखाने व्यवस्थित सुरु असून त्यांनी गाळप क्षमता वाढविल्याने तेथून आता ऊस उपलब्ध होणार नसल्याने सर्वाधिक दर, वेळेवर पेमेंट यामध्ये आघाडीवर असलेला श्रीराम अडचणीत आणण्याचा हा प्रयत्न आणि यामागे बोलविता धनी दुसराच कोणी नाही ना ? असा सवाल पत्रकार परिषद उपस्थित करुन श्रीराम कारखान्याबाबत करण्यात आलेल्या निराधार आरोपातून हे स्पष्ट होत असल्याचे श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी सांगितले आहे.

खोटा प्रचार, बिनबुडाचे आणि दिशाभूल करणारे आरोप सुरु
आर्थिक गर्तेतून बाहेर पडून श्रीराम सर्वाधिक गाळप, एफ. आर. पी. पेक्षा अधिक ऊस दर आणि वेळेवर पेमेंट, कामगारांचे नियमानुसार पगार, एकरी ऊस उत्पादन वाढीसाठी प्रयत्न आणि श्रीराम साखर कारखाना व अर्कशाळा यांना पूर्ववैभव प्राप्त करुन देत ऊस उत्पादकांची वाहव्वा मिळवीत असल्याचे लक्षात आल्याने हा खोटा प्रचार, बिनबुडाचे आणि दिशाभूल करणारे आरोप सुरु झाले आहेत, तथापि त्यात तथ्य नसल्याचे सर्वानाच माहित असल्याने आपणही त्याला फार महत्व देणार नाही, मात्र या निमित्ताने ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी केलेल्या कामांची माहिती देण्यासाठी ऊस उत्पादकांसमोर वस्तुस्थिती मांडणार असल्याचे श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी सांगितले.

प्रतिदिन केवळ १ हजार टन गाळप क्षमतेने सुरु झालेला जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखाना आता प्रतिदिन २० हजार टन गाळप क्षमतेपर्यंत पोहोचविण्यासाठी ज्यांनी अहोरात्र मेहनत घेतली, शेतकरी हित हेच उद्दिष्ट ठेवले त्यांची सक्रिय साथ लाभून श्रीराम उर्जीतावस्था प्राप्त करीत असताना त्या आवाडे दादांवर चुकीचे आरोप करणे गैर व अवाजवी असल्याचे श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट केले.

श्रीराम कारखाना अवसायानात न काढता पूर्व वैभवाप्रत नेण्याचा निर्धार पूर्णत्वास
आर्थिक गर्तेत रुतलेला श्रीराम त्यातून बाहेर काढून पूर्वपदावर आणण्याची प्रबळ इच्छा आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर आणि तत्कालीन चेअरमन श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांची होती म्हणूनच त्यांनी श्रीराम अवसायानात काढण्याची सूचना सर्वस्तरावरुन आली तरी कोणत्याही परिस्थितीत आपले आजोबा श्रीमंत मालोजीराजे राजेसाहेब, माजी आमदार श्रीमंत शिवाजीराजे नाईक निंबाळकर आणि त्यांच्या तत्कालीन सहकाऱ्यांनी शेतकऱ्यांचे हित समोर ठेवून  उभारलेला श्रीराम कारखाना अवसायानात न काढता पूर्व वैभवाप्रत नेण्याचा निर्धार केला आणि त्यामध्ये ते यशस्वी झाल्याचे विद्यमान चेअरमन डॉ. बाळासाहेब शेंडे यांनी निदर्शनास आणून दिले.

श्रीरामच्या हिताला गालबोट लावणे अयोग्य
तालुक्यातील हा एकमेव सहकारी साखर कारखाना टिकला पाहिजे तरच ऊस उत्पादक आणि शेतकऱ्यांचे हित जपले जाईल याची जाणीव किंबहुना खात्री असल्यानेच ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी साथ केली आणि म्हणून श्रीराम पुन्हा दिमाखात उभा रहात असताना त्याला गालबोट लावणे कोणाच्याच हिताचे नसल्याचे डॉ. बाळासाहेब शेंडे यांनी ठणकावून सांगितले.

प्रामाणिक प्रयत्न, प्रबळ इच्छा शक्ती आणि सर्वांची साथ याद्वारे श्रीरामला पूर्व वैभव
श्रीरामची बाजारात पत शून्य होती, कोणतीही वित्तीय संस्था श्रीरामला अर्थसहाय्य करण्यास तयार नव्हती, अन्य कोणी हा कारखाना चालविण्यास तयार होत नव्हते, अशावेळी खा. शरदराव पवार आणि जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे सर्वेसर्वा आदरणीय कल्लाप्पा आण्णा आवाडे (दादा) यांनी मार्गदर्शन केले आणि श्रीराम जवाहर शेतकरी सहकारी साखर उद्योग या संस्थेची स्थापना करुन त्या माध्यमातून श्रीरामला पूर्ववैभवाप्रत नेण्याचा नवा मार्ग निर्माण करण्यात आला. २ सहकारी संस्थांच्या माध्यमातून ३ री सहकारी संस्था उभी करुन तिच्या माध्यमातून अवसायानात निघण्याच्या स्थितीपर्यंत पोहोचलेली संस्था पुन्हा उभी करुन पूर्ववैभवा पर्यंत नेण्याची संकल्पना तशी सोपी नव्हती पण प्रामाणिक प्रयत्न आणि प्रबळ इच्छा शक्ती आणि सर्वांची साथ याद्वारे ते शक्य झाल्याचे डॉ. बाळासाहेब शेंडे यांनी निदर्शनास आणून दिले.

करारास साखर आयुक्त आणि समितीची मान्यता
या योजनेनुसार दोन्ही संस्थांमध्ये १५ वर्षांचा भागीदारी करार झाला, त्यानुसार श्रीराम चालविणाऱ्या संस्थेने श्रीरामला मोबदला स्वरुपात पहिली ५ वर्षे गाळप झालेल्या प्रत्येक टनास १०० रुपये, दुसऱ्या ५ वर्षात प्रती टन ११० रुपये आणि तिसऱ्या ५ वर्षात प्रती टन १२० देण्याचे ठरले होते. त्यावेळी कारखाना संकटात होता, गाळप क्षमता कमी होती त्यामुळे कामगारांनी २० % पगार कमी घेतला, बोनस केवळ ८.३३ % देण्यात आला, महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या थकित कर्जाची परतफेड करणे अनिवार्य होते त्यामुळे काही प्रमाणात जादा पैसे श्रीरामला मिळाले, मात्र आता दुसऱ्या १५ वर्षांच्या करारात कामगार पगार कपात तर नाहीच उलट नियमानुसार वेतन वाढी प्रमाणे जादा पगार द्यावे लागतील, बोनस ८.३३ % नव्हे आता इतरांप्रमाणे कदाचित १५/२० टक्के तसेच गाळप क्षमता वाढीसाठी सुमारे १०० कोटी रुपयांची गुंतवणूक करावी लागणार आहे, ती संपूर्ण जबाबदारी जवाहरवर सोपविण्यात आली आहे, शिवाय मागील थकित देणी देण्यासाठी १७ कोटी रुपये जवाहरने दिले आहेत या सर्व बाबींचा विचार करुन गत करारा पेक्षा मोबदला कमी मिळाला तरी तो प्रचलित कायद्यातील तरतुदींचा विचार करुन साखर संचालक यांचे समोर झाला असून त्यावर त्यांची सही आहे, इतकेच काय या करारास तत्कालीन सहकार मंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील समितीनेही संमती दिली असल्याने हा करार पारदर्शी, कायद्यातील तरतुदी आणि नियमानुसार केला असल्याने एक आदर्श करार असल्याचे डॉ. बाळासाहेब शेंडे यांनी निदर्शनास आणून दिले आहे.

ऊस उत्पादकांना सर्वाधिक दर देण्याला प्राधान्य
सदर करार करताना ऊस उत्पादक सभासदांना सर्वाधिक दर कसा देता येईल याला प्राधान्य देण्यात आले असल्याचे निदर्शनास आणून देत करार करताना ती बाब सांभाळण्यात आल्याचे आणि यापूर्वी व यापुढेही ऊसाला एफ आर पी पेक्षा अधिक दर देण्यात येणार असल्याचे डॉ. शेंडे यांनी स्पष्ट केले.

अर्कशाळेतूनही भरीव फायदा मिळणार
श्रीरामची अर्कशाळा चालविताना गतवर्षीच्या करारानुसार दरमहा १९.५० लाख रुपये म्हणजे वार्षिक २३४ लाख रुपये मिळणार होते, मात्र नैसर्गिक आपत्ती किंवा अन्य कारणाने अर्कशाळा बंद राहिली तर त्या कालावधीचे भाडे मिळणार नव्हते, आता काहीही झाले तरी वार्षिक २५० लाख मिळणार आहेत, शिवाय केवळ इथेनॉल उत्पादन घेतले जाणार असल्याने देशी व विदेशी दारु उत्पादनाचे परवाने अन्य कोणास देवून त्यातून अधिकचे उत्पन्न अर्कशाळेस मिळणार असल्याने नव्या करारानुसार श्रीरामचा तोटा नव्हे अधिक फायदा होणार आहे,  मात्र त्याकडे त्यादृष्टीने पाहण्याची आवश्यकता असल्याचे डॉ. बाळासाहेब शेंडे यांनी सांगितले आहे.

कॅश फ्लो सांभाळण्यासाठी डीपॉझीट
भागीदारी करार होताना डीपॉझीट दिले जात नाही तथापि आगामी काळात मागील देणी व अन्य आर्थिक तरतुदी सांभाळण्यासाठी तयार करण्यात आलेल्या कॅश फ्लो नुसार  आवश्यक असलेले १७ कोटी रुपये जवाहरने आगाऊ दिले असून त्यापैकी केवळ ८.५० कोटींवर १२ % प्रमाणे व्याज द्यावे लागणार आहे, त्या संपूर्ण रकमेची परतफेड करार कालावधीत टप्प्याटप्याने होणार असल्याने व्याजाचा फार मोठा बोजा असेल हे चुकीचे असून करार संपेल त्यावेळी कोणी कोणाचे एक रुपया देणे राहणार नाही पण १०० कोटी गुंतवणूक केलेल्या १० हजार टन प्रतिदिन गाळप क्षमतेच्या नवीन मशिनरीसह संपूर्ण श्रीराम आणि अर्कशाळेची मालकी फक्त श्रीरामच्या सभासद शेतकऱ्यांची राहणार असल्याचे डॉ. बाळासाहेब शेंडे यांनी निदर्शनास आणून दिले आहे.

एफ. आर. पी. पेक्षा ८७ रुपये प्रति टन अधिक दिले, यावर्षीही देणार
सन २०२१ – २२ च्या हंगामात श्रीरामने ५ लाख ५ हजार ४२५ मे. टन ऊसाचे गाळप केले असून एफ. आर. पी. २६५३.७० रुपये प्रति टन असताना प्रतिटन २७६१ रुपये प्रमाणे म्हणजे प्रती टन ८७.३० रुपये जादा दिले आहेत. एकूण ४ कोटी ४१ लाख ७३ हजार रुपये ऊस उत्पादकांना जादा दिल्याचे निदर्शनास आणून देत प्रत्येक बाबतीत श्रीराम जवाहरने ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे हित पाहिल्याचे नमूद करीत त्यासाठीच आता माती परिक्षणाद्वारे योग्य व पुरेशी खत मात्रा, उत्तम व दर्जेदार ऊस बियाणे, योग्य वेळी ऊसाची लागण, ठिबक सिंचनाचा वापर आणि एकरी अधिक उत्पादन हे तंत्र सांभाळण्यासाठी शेतकऱ्यांना योग्य कृषी विषयक मार्गदर्शन करण्याची योजना सुरु करण्यात आल्याचे डॉ. बाळासाहेब शेंडे यांनी निदर्शनास आणून दिले आहे.

प्रतिदिन १० हजार मे. टन गाळप आणि सर्वाधिक पेमेंट यात तडजोड नाही
१७००/१८०० प्रतिदिन गाळप क्षमतेचा श्रीराम दुसऱ्यावर्षी प्रतिदिन २५०० मे. टन, तिसऱ्या वर्षी ४२०० मे. टन आणि यावर्षी ५ हजाराहून अधिक गाळप करणार तर पुढच्या वर्षीपासून प्रतिदिन १० हजार मे. टन गाळप करुन ऊस उत्पादकांची वेळेवर गाळपाची चिंता दूर करण्याबरोबर सर्वाधिक दर, वेळेवर ऊस तोड, नियमाप्रमाणे पेमेंट बँक खात्यात जमा हे सूत्र प्राधान्याने सांभाळणार असल्याची ग्वाही डॉ. बाळासाहेब शेंडे यांनी दिली आहे.

श्रीराम व साखरवाडी तालुक्याच्या विकासाची केंद्र ठरणार
अवसायानात काढण्याच्या स्थितीत असलेला श्रीराम आणि लिलावात विक्री झालेला साखरवाडी कारखाना बंद झाले तर तालुक्यातील ऊस उत्पादकांची आणि कामगारांची अवस्था बिकट होणार असल्याचे लक्षात घेऊन आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी अहोरात्र मेहनत घेऊन दोन्ही साखर कारखाने पुन्हा उभे करण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे.

आगामी काळात श्रीराम प्रतिदिन १० हजार मे. टन गाळप व ६० हजार के. एल. पी. डी. इथेनॉल उत्पादन आणि देशी दारु उत्पादन परवाण्यातून मिळणाऱ्या एकूण उत्पन्नतून ऊस उत्पादकांना सर्वाधिक ऊस दर, अन्य सवलती, कामगारांना नियमानुसार पगार व अन्य लाभ देण्याबरोबर तालुक्याच्या विकासाचे केंद्र म्हणून आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत राहणार आहे.

दत्त इंडिया प्रा. लि., साखरवाडी हा खाजगी कारखानाही ऊस उत्पादकांचे हिताला प्राधान्य देवून ऊस उत्पादकांना अधिक दर, कामगारांना नियमानुसार पगार देत साखर, इथेनॉल, वीज, शुगर बॅग उत्पादनासह तालुक्याच्या विकासाला हातभार लावणारे केंद्र म्हणून कार्यरत राहणार आहे.


Back to top button
Don`t copy text!