
दैनिक स्थैर्य । 19 एप्रिल 2025। सातारा। पाटण तालुका हा निसर्गाने नटलेला तालुका आहे. हा तालुका डोंगरी असून जास्त करून येथील नागरिक शेती व पशुधनावर अवलंबून आहे. पर्यटन विभागाकडून येथील निसर्ग संपदेच्या माध्यमातून स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत, अशी ग्वाही पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.
कोयना दौलत डोंगरी महोत्सवाचे मंगळवार दि. 15 ते गुरुवार दि. 17 एप्रिल कालावधीत मरळी तालुका पाटण येथे आयोजन करण्यात आले होते. याचा समारोप कार्यक्रम पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली झाला. यावेळी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक समीर शेख, जिल्हा कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे, लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन यशराज देसाई आदी उपस्थित होते.
पालकमंत्री शंभूराज देसाई म्हणाले, गृहराज्यमंत्री असताना पोलीस अधिकारी- कर्मचार्यांच्या घरांच्या राहण्याचा प्रश्न सोडविला. राज्य उत्पादन शुल्क मंत्री असताना उत्पादन शुल्क विभागातील अधिकारी कर्मचार्यांच्या प्रशिक्षण केंद्र वाटोळे तालुका पाटण येथे मंजूर केले. या प्रशिक्षण केंद्राचे काम सुरू झाले आहे. दोन ते चार मे या कालावधीत महाबळेश्वर येथे पर्यटन उत्सव होणार आहे. ज्या ज्या विभागाची जबाबदारी मंत्री म्हणून माझ्यावर आली, मी नवीन काही काम करण्याचा प्रयत्न करीत असतो. याच माध्यमातून कोयना दौलत डोंगरी महोत्सव आयोजित करण्यात आला. या कोयना दौलत डोंगरी महोत्सवाचे चांगले नियोजन केल्याबद्दल पालकमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनाचे कौतुकही केले.
जिल्हाधिकारी संतोष पाटील म्हणाले, पालकमंत्र्यांच्या मार्गदर्शनानुसारच कोयना दौलत डोंगरी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. डोंगरी भागातील सर्व नागरिकांबरोबर बालकांचाही विचार करून वॉटर स्पोर्ट, पशुपक्षी प्रदर्शन, कृषी प्रदर्शन, आनंद मेळा, पॅराग्लायडिंग, घोडे सवारीचे आयोजन करण्यात आले. या तीन दिवसीय डोंगरी महोत्सवाला 70 हजाराहून अधिक नागरिकांनी भेट दिली. बचत गटांनी उत्पादित केलेल्या मालांचे 23 स्टॉल लावण्यात आले होते. या स्टॉलच्या माध्यमातून बचत गटांची 23 लाखांची विक्री झाली आहे.
कार्यक्रमाच्या प्रारंभी शेतकरी महिला पशुपालक यांचा सन्मान पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच कृषी विभागाने तयार केलेल्या शेतकर्यांविषयी असलेल्या विविध योजनांची एकत्रित माहितीचे क्यूआर कोड लोकार्पणही पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याहस्ते यावेळी झाले.