फलटण – पंढरपूर व फलटण – बारामती रेल्वेसाठी प्रयत्न सुरु : खा.रणजितसिंह नाईक निंबाळकर

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ०४ मार्च २०२२ । फलटण । देशातील एक लाख 80 हजार कोटींचा महात्वाकांक्षी मुंबई-हैद्राबाद हा बुलेट ट्रेनचा मार्ग फलटण येथून वळविण्यात यावा यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. रेल्वेच्या माध्यमातून दळणवळणाद्वारे फलटण तालुक्यातील व माढा लोकसभा मतदार संघाचा निश्‍चितपणे आर्थिक विकास होईल असा विश्‍वास दर्शवून रखडलेले फलटण-बारामती व फलटण-पंढरपूर हे मार्ग कार्यान्वित करण्यासाठी आवश्यक प्रयत्न व हालचाली सुरु असल्याची माहिती खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दिली.

फलटण येथील प्रांत कार्यालयात खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली रेल्वेची आढावा बैठक पार पडली, त्यामध्ये ते बोलत होते. बैठकीस रेल्वेच्या डीआरएम रेणू शर्मा, एसआरडीसीएम सुनील शर्मा, डीआरएम मिलींद वाघोलीकर, प्रांत शिवाजीराव जगताप, तहसिलदार समीर यादव आदींची यावेळी उपस्थिती होती. सदर बैठकीत फलटण- पुणे गाडीचे वेळ ठरविने, गती वाढविने, फलटण-मुंबई रेल्वे सुरु करने, मुंबई-हैद्राबाद ट्रेन फलटणमार्गे वळविने, फलटण-बारामती मार्गावरील जमिनी हस्तांतरीत करने, फलटण-पंढरपूर रेल्वे मार्गाचा आढावा घेणे यासह विविध महत्वपुर्ण विषय, समस्यांवर यावेळी चर्चा झाली.

फलटण-पुणे रेल्वेचा फायदा शेतकरी, व्यापारी, विद्यार्थी, नोकरवर्ग, सर्वसामान्य जनता व प्रवाशी यांना सर्वार्थाने होण्यासाठी तीची वेळ सर्वांना सोयीची असावी यास आपले प्राधान्य राहील, तसेच या गाडीचा वेग वाढविण्यासाठी आवश्यक पावले नक्कीच उचलली जातील असे स्पष्ट करुन खा. रणजितसिंह म्हणाले, फलटण-मुंबई ही गाडीही लवकरच सुरु करण्यात येईल. फलटण-बारामती लोहमार्गाबाबत जमिनी हस्तांतराबाबतच्या ज्या समस्या आहेत त्या सोडविण्यासाठी रेल्वेच्या अधिकार्यांनी लक्ष घालावे. सदरचा मार्ग गेली तेवीस वर्षे रखडल्याने या भागातील औद्योगिक विकासही रखडल्याचे खा. रणजितसिंह यांनी निदर्शनास आणले. मुंबई-हैद्राबाद हा बुलेट ट्रेनचा केंद्राचा एक लाख 80 हजार कोटींचा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. सदरचा मार्ग फलटण (सस्तेवाडी) मार्गे वळवावा अशी या भागातील जनतेची मागणी आहे. या रेल्वेमुळे फलटणहून मुंबई अथवा हैद्राबाद येथे केवळ चाळीस मिनिटांमध्ये पोहचता येणार आहे.

दरम्यान, फलटण-पुणे डेम्यू रेल्वेच्या संदर्भात तीची वेळ बदलावी व गतीमध्ये वाढ व्हावी अशी मागणी आहे. यासाठी शुक्रवार दि. 11 मार्च रोजी फलटण प्रांत कार्यालय येथे व्यापार्यांची बैठक बोलाविण्यात येणार आहे. यावेळी स्थानिक प्रशासकीय व रेल्वेचे अधिकारी, पत्रकार, व्यापारी, शेतकरी यांची समिती नेमून ती जी वेळ देईल त्यानुसार सदर रेल्वे चालेल असे खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट केले.


Back to top button
Don`t copy text!