सामाजिक न्याय विभागाच्या योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहचवण्यासाठी प्रयत्न करावेत – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १२ जुलै २०२३ । नाशिक । सामाजिक न्याय व सक्षमीकरण या केंद्रीय मंत्रालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहचवण्यासाठी प्रयत्न करण्यात यावे, असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.

आज शासकीय विश्रामगृह येथे सामाजिक न्याय व सक्षमीकरण या केंद्रीय मंत्रालयामार्फत नाशिक विभागात राबविण्यात येणाऱ्या योजनांची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्या बैठकीत केंद्रीय राज्यमंत्री श्री. आठवले बोलत होते. यावेळी  जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, उपायुक्त रमेश काळे, समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त सुंदरसिंग वसावे, सहायक जिल्हाधिकारी तथा उप विभागीय अधिकारी नाशिक व कळवण जितीन रहमान, विशाल नरवाडे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी योगेश पाटील यांच्यासह संबंधित विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले म्हणाले, केंद्र सरकारच्यावतीने अनुसूचित जाती-जमाती, मागासवर्गीय, जेष्ठ नागरीक, दिव्यांग यांच्या सबलीकरणासाठी विविध योजना राबविण्यात येतात. देशाच्या एकूण लोकसंख्येच्या साधारण 85 टक्के लोकसंख्या ही सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालयाच्या अंतर्गत येत असल्याने नाशिक विभागातील प्रत्येक जिल्ह्याने ग्रामीण भागात या केंद्रीय योजनांचा लाभ प्रत्येक गरजू लाभार्थ्याला मिळण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. तसेच आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन या योजनेबाबत समाजात माहिती उपलब्ध करून द्यावी, जेणेकरून आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना या योजनेचा लाभ मिळू शकेल. ही योजना समाजाला एकत्र आणण्यासाठी महत्वाची भूमिका बजावते, असे सांगून नाशिक विभागातील प्रत्येक जिल्ह्याने केलेले काम कौतुकास्पद असल्याचे ही श्री. आठवले यांनी यावेळी नमूद केले.

या बैठकीत केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी प्रधानमंत्री आवास योजना, जनधन योजना, प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना, अटल पेन्शन योजना, मुद्रा योजना, प्रधानमंत्री उज्ज्वला योजना, अनुसूचित जाती उपयोजना, प्री मॅट्रीक व पोस्ट मॅट्रीक शिष्यवृत्ती योजना, आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन योजना, वृद्धाश्रम  योजना, सफाई कामगारांसाठी असलेल्या योजनांचा यावेळी आढावा घेतला.


Back to top button
Don`t copy text!