जावलीला जगाच्या नकाशावर आणण्यासाठी सर्वांच्यासोबत ग्रामस्थांचे प्रयत्न गरजेचे : श्रीमंत सौ. शिवांजलीराजे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य । दि. २६ मे २०२२ । फलटण । बारामती कृषी विकास प्रतिष्ठानच्या विश्वस्त सौ. सुनंदाताई पवार यांनी केलेल्या मार्गदर्शन हे आगामी काळामध्ये नक्कीच आपल्या सगळ्यांना मार्गदर्शक ठरणार आहे. बचतगटासाठी सौ. सुनंदाताई पवार यांचे मोठे काम आहे. बारामती, इंदापुर, पुरंदर, कर्जत व जामखेड तालुक्यात सौ. सुनंदाताई पवार यांनी मोठे काम केलेले आहे. जावली गावाला जगाच्या नकाशावर आणण्यासाठी सर्वांच्यासोबतच जावली ग्रामस्थांनी भाग घेणे गरजेचे आहे, असे मत श्रीमंत सईबाई महाराज नागरी सहकारी पतसंस्थेच्या चेअरमन श्रीमंत सौ. शिवांजलीराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केले.

फलटण तालुक्यातील जावली येथे छत्रपती शिवाजी विद्यापीठ, फलटण एज्युकेशन सोसायटी, मुधोजी महाविद्यालय, कृषी विज्ञान केंद्र, गोविंद फौंडेशन, सॅटेलाईट रोटरी क्लब फलटण यांच्यासह विविध संस्थाच्या माध्यमातून राष्ट्रीय सेवा योजनेचे शिबिर आयोजित करण्यात आलेले आहे. यावेळी अध्यक्षस्थानावरून श्रीमंत सौ. शिवांजलीराजे नाईक निंबाळकर बोलत होत्या. यावेळी बारामती कृषी विकास प्रतिष्ठानच्या विश्वस्त सौ. सुनंदाताई राजेंद्र पवार, माणदेशी रेडिओच्या आरजे सौ. केराबाई सरगर, जेष्ठ नेते भिमदेव बुरुंगले, जावली शाळा व्यवस्थापन समितीचे प्रमुख राजकुमार गोफणे, जावलीच्या सरपंच सौ. ज्ञानेश्वरी मकर, प्रा. सुधीर इंगळे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.

येणार्या काळामध्ये पर्यावरणावर काम करणे गरजेचे आहे. जावली सारख्या ग्रामीण भागामध्ये राज्याच्या विविध भागांतून आलेल्या मुला व मुलींचे कष्ट वाया जावु न देण्याचे काम हे जावली ग्रामस्थांचे कामकाजच आहे. स्वच्छतेची सवय ही आपण सर्वांनी स्वत:ला सवय लावणे गरजेचे आहे. स्वच्छतेची सवय लावायची असेल तर आपल्याला स्वतःला बदलणे गरजेचे आहे, असेही यावेळी श्रीमंत सौ. शिवांजलीराजे नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट केले.

राजकारण बाजुला सोडून एकत्र येणार्यांच्या सोबत घेवुन आपण कामकाज केले पाहीजे. जावली गाव जागतिक नकाश्यावर येण्यासाठी आपण कामकाज करणे गरजेचे आहे. तरूणांनी पुण्या – मुंबईत जावुन नोकरी करण्यापेक्षा आपल्या गावी राहुन शेती व शेतीपुरक व्यवसाय केले तर नक्कीच फायद्याचे ठरणार आहे. शेतीकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलण्याचा गरज आहे. नोकरीच्या समस्या गंभीर आहे व पुढील काळात सुध्दा अत्यंत गंभीर बनणार आहे, असे मत बारामती कृषी विकास प्रतिष्ठान विश्वस्त सौ. सुनंदाताई राजेंद्र पवार यांनी व्यक्त केले.

दुरवरून प्रवास करून आपली जावली साफ करण्यासाठी व वृक्ष लागवड करण्यासाठी आपण सर्व जण आलो आहोत. इथे आलेल्या सर्वांचा आगामी काळामध्ये जावली ग्रामस्थांनी जाणीव ठेवावी. माझ्या आयुष्यात राजमाता जिजाऊ आईसाहेब व राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा कायमच प्रभाव राहिला आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनाचा आढावा घेतला तर अतिशय कणखर काळखंडात त्यांनी आपला प्रवास केला. ज्यामुळे आज आपण सर्व लिहू वाचू शकतो अश्या असलेल्या सावित्री बाई फुले यांचे आदर्श कायम माझ्यापुढे राहिले आहेत, असेही बारामती कृषी विकास प्रतिष्ठान विश्वस्त सौ. सुनंदाताई राजेंद्र पवार यांनी स्पष्ट केले.

आपल्या भारताच्या ग्रामीण भागातील तरुण पिढीने आगामी काळामध्ये नक्की कश्याप्रकारे आपल्याला करता येणार आहे, याचा विचार आपल्याला करावा लागणार आहे. आपले करियर व आपले स्वप्नांचा मागोवा घेत समाजाविषयी जागृती असणे आता गरजेचे आहे. आगामी काळामध्ये पाणी, प्लास्टीक व वृक्ष संवर्धन या विषयांवर काम करणे गरजेचे आहे. एकमेकांची जिरवाजिरवी करण्यापेक्षा पाणी आडवुन पाणी जिरवणे गरजेचे आहे. एकमेकांची जिरवाजिरवी करून फक्त रक्तदाबाची गोळीच सुरू होती, त्याशिवाय काहीही होत नाही, असेही स्पष्ट मत सौ. सुनंदाताई पवार यांनी व्यक्त केले.

आमदार रोहीत पवार यांच्या कार्याचा व जीवनाच्याबाबत माहीती यावेळी सौ. सुनंदाताई पवार यांनी दिली.

शिवाजी विद्यापीठ व मुधोजी महाविद्यालयाचे हे रा. स. यो. चे विशेष शिबिर केले आहे. श्रीमंत सौ. शिवांजलीराजे नाईक निंबाळकर यांचे गोविंद व इतर संस्थांच्या माध्यमातून कायमच सामाजिक कार्यात कार्यरत आहेत. आता जावली गावामध्ये होणार्या वृक्ष लागवड व संवर्धनाला श्रीमंत सौ. शिवांजलीराजे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभणार आहे. सौ. सुनंदाताई पवार यांच्या माध्यमातून बारामती, कर्जत व जामखेड तालुक्यात वृक्ष लागवड व संवर्धनाचे काम करतात. जावली गावाचा विकास करण्यासाठी गावातील वाद मिटवुन एकत्र येण्याची गरज आहे, असे मत प्रास्ताविकात प्रा. सुधीर इंगळे यांनी व्यक्त केले.


Back to top button
Don`t copy text!