स्थैर्य, फलटण, दि. 18 : पुणे येथील जगविख्यात मगरपट्टा सिटी विकसन करताना स्थानिक शेतकर्यांच्या भागीदारीमधून ज्याप्रमाणे औद्योगिक वसाहत उभी करण्यात आलेली आहे. त्याच धर्तीवर फलटण तालुक्यातील मिरगाव, ढवळेवाडी व नांदल या गावामध्ये अतिरिक्त औद्योगिक वसाहत उभी करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे, महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती ना.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी सांगितले.
फलटण पंचायत समितीच्या सभागृहामध्ये अतिरिक्त औद्योगिक वसाहती बाबत आयोजित केलेल्या बैठकीत ना.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर बोलत होते. यावेळी फलटणचे – कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार दीपक चव्हाण, सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व विद्यमान सदस्य श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, फलटणचे प्रांताधिकारी शिवाजीराव जगताप, महाराष्ट्र राज्य औद्योगिक वसाहत महामंडळाचे उपविभागीय अधिकारी इंगळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना ना.श्रीमंत रामराजे म्हणाले की, शेतकर्यांचे कोणत्याही प्रकारचे नुकसान न होता पुणे येथे मगरपट्टा सिटीचा ज्या प्रकारे विकास करण्यात आलेला आहे. त्याच प्रकारे फलटण येथे अतिरिक्त औद्योगिक वसाहत उभारून तालुक्यात उत्तम कंपन्या आणून रोजगारनिर्मितीसाठी आपण प्रयत्नशील राहणार आहोत. फलटण तालुक्याला कमिन्स या एका कंपनीवर अवलंबून न राहता छोट्या मोठ्या कंपन्याही या ठिकाणी सुरू होणे गरजेचे आहे. आगामी काळामध्ये साकारत असलेल्या अतिरिक्त औद्योगिक वसाहतीमध्ये मोठ्या कंपन्यांबरोबरच स्थानिक व्यवसायिकांना परिपूर्ण सुविधा देऊन व्यवसाय वाढीसाठी व आर्थिक उन्नतीसाठी आपले विशेष प्राधान्य राहणार असल्याचेही, नर,श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी यावेळी स्पष्ट केले.
औद्योगिक वसाहत उभारताना त्या ठिकाणच्या जमिनीला शेतकर्यांचा योग्य मोबदला मिळावा यासाठी ना.श्रीमंत रामराजे यांनी प्रयत्न करावेत या शेतकर्यांच्या मागणीवर बोलताना, औद्योगिक वसाहतीमध्ये जाणार्या जमिनींना बाजार भावापेक्षा नक्कीच ज्यादा दर देण्यात येईल, अशी ग्वाही ना.श्रीमंत रामराजे यांनी उपस्थित शेतकर्यांना दिली व प्रांताधिकारी शिवाजीराव जगताप यांना याबाबतचा लेखांकित अहवाल शासनाकडे सादर करावा असे निर्देशही यावेळी दिले.
कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागामध्ये असणार्या नांदवळ करंजखोप येथील माळरानावर सुद्धा औद्योगिक वसाहत उभी करून येथील स्थानिकांना सुद्धा रोजगार निर्मिती करून देणार आहे. या भागाच्या जवळून म्हणजेच दहा किलोमीटर अंतरावर वरूनच आशियाई महामार्ग जात असल्याने तेथील जागांना नक्कीच मोठमोठ्या कंपन्या पसंती देतील, असेही ना.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी सांगितले.