स्थैर्य, फलटण, दि. १ : करोनाच्या वाढत्या प्रार्दुभावाच्या पार्श्वभूमीवर फलटण उपजिल्हा रुग्णालयात करोना उपचारासाठी आवश्यक साधने, सुविधा, पुरेसे वैद्यकिय अधिकारी/ कर्मचारी उपलब्ध करुन द्यावेत आणि हे स्वतंत्र सक्षम करोना उपचार रुग्णालय तातडीने उभे करावे, अशी मागणी फलटण तालुक्यातील पत्रकार व वृत्तपत्र संपादकांनी आ. दीपक चव्हाण यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
याबाबत महाराष्ट्र विधान परिषद सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सत्कारात्मक प्रतिसाद देण्याचे आश्वासन आ. दीपक चव्हाण यांनी यावेळी दिले. आ. दीपक चव्हाण यांना सदरचे निवेदन ज्येष्ठ पत्रकार रविंद्र बेडकिहाळ, अरविंद मेहता यांनी दिले. यावेळी पत्रकार यशवंत खलाटे, नसिर शिकलगार, युवराज पवार, विक्रम चोरमले, बाळासाहेब ननावरे, शक्ती भोसले, प्रशांत रणवरे उपस्थित होतेे.
आ. चव्हाण यांना देण्यात आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, फलटण शहर व तालुक्यात ‘कोवीड – 19’ च्या नियंत्रणासाठी शासन/प्रशासनाने घालुन दिलेल्या सर्व नियम/निकषांची अंमलबजावणी करण्यात शहर व तालुक्यातील नागरिकांनी प्रशासनास आवश्यक ते सर्व सहकार्य केले. प्रशासनाने प्रामुख्याने महसूल, पोलीस, आरोग्य, पंचायत समिती अधिकारी / कर्मचार्यांनीही सतत मेहनत घेतली, किंबहुना लोकप्रतिनिधी, प्रशासन व सर्वसामान्य नागरिक यांची भक्कम एकजूट निर्माण झाल्याने फलटण शहर व तालुक्यात आत्तापर्यंत करोना नियंत्रणात राहिला.
मात्र पुण्या – मुंबईतून मोठ्या संख्येने आलेल्या आपल्या नातेवाईक, मित्रमंडळी, कुटुंबियांच्या बाबतीत नियम/निकष सांभाळताना काहीसे कमी पडलो. मोठ्या संख्येने गावागावात दाखल झालेल्या या आपल्याच लोकांना आपल्या घरात किंवा शाळेत क्वारंटाईन करुन ठेवले असताना किमान 14 दिवस त्यांनी तेथून बाहेर न पडणे, त्यांना तेथेच स्वतंत्रपणे जेवण, चहा, नाष्टा तसेच आंघोळीची व्यवस्था करण्यात आली, तेथे राहणे आवश्यक आहे. जेथे हे सांभाळले गेले ती गावे आजही सुरक्षीत आहेत, जेथे काही लोकांनी हे सांभाळले नाही तेथे करोना बाधीतांची संख्या आढळून येत आहे. त्यावर योग्य नियंत्रणासाठी सतत प्रबोधन आणि गावाचा थोडा वचक निर्माण केला पाहिजे.
याबरोबरच वाढत्या रुग्णसंख्येवर योग्य औषधोपचारासाठी शहर व तालुक्यात सध्या असलेली वैद्यकिय सुविधा पुरेशी नाही, त्यासाठी उपजिल्हा रुग्णालयातील 50 बेडपैकी 5 बेडचे आय.सी.यू. आणि 5 बेड ऑक्सीजनसाठी ठेवून एकूण 50 बेडचे स्वतंत्र, सक्षम कोवीड उपचार रुग्णालय निर्माण करावे. त्यासाठीचा आवश्यक प्रस्ताव तयार करुन तातडीने कार्यवाही व्हावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
तसेच शंकर मार्केट येथील नगर परिषद दवाखान्याची अशाच प्रकारे आवश्यक वैद्यकीय साधने/सुविधा आणि 5 बेडचे आय.सी.यु. केंद्रासह उभारणी तातडीने करावी. फलटण – गिरवी रस्त्यावर, झिरपवाडी, ता.फलटण गावचे हद्दीत उभारण्यात आलेले मात्र वापरावीना दुरावस्था झालेली ग्रामीण रुग्णालयाची जुनी इमारत किरकोळ दुरुस्त्या व दारे, खिडक्या बसवून तेथेही एक सुसज्ज रुग्णालय उभारण्यात यावे. आज करोना रुग्ण संख्या कमी आहे, तथापी भविष्यात बदलते हवामान, पावसाळा व अन्य कारणाने करोना रुग्ण संख्या वाढण्याचा धोका लक्षात घेवून वरील तीनही रुग्णालये प्राधान्याने उभी करावीत. त्यापैकी उप जिल्हा रुग्णालय सक्षमीकरण प्रस्ताव तातडीने तयार करुन पुढील कार्यवाही लगेच करावी, ही आमची आग्रही मागणी आहे.
शासन/प्रशासनाने याची दखल घेतली नाही तर आम्ही सर्व पत्रकार शासनाचे या गंभीर विषयाकडे लक्ष वेधण्यासाठी शांततेच्या मार्गाने लाक्षणिक उपोषण करणार आहोत, असा इशाराही सदरच्या निवेदनात पत्रकारांच्यावतीने देण्यात आला आहे.
दरम्यान, या निवेदनाची प्रत प्रांताधिकारी शिवाजीराव जगताप यांना देवून त्यांच्याशी सविस्तर चर्चा करण्यात आली. निवेदनाची प्रत महाराष्ट्र विधान परिषद सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, राज्याचे मुख्यमंत्री ना. उद्धव ठाकरे, उप मुख्यमंत्री ना. अजित पवार, खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर, पालक मंत्री ना. बाळासाहेब पाटील, आरोग्य मंत्री ना. राजेश टोपे, जिल्हाधिकारी, सातारा, जिल्हा पोलीस प्रमुख यांच्याकडे रवाना करण्यात आली आहेत.