![](https://i0.wp.com/sthairya.com/wp-content/uploads/2025/02/BIOControl.jpg?resize=709%2C354&ssl=1)
दैनिक स्थैर्य | दि. ७ फेब्रुवारी २०२५ | फलटण |
गेल्या काही वर्षांमध्ये कीड नियंत्रणासाठी वाढलेल्या रासायनिक कीटकनाशकांच्या वापरामुळे किडींमध्ये प्रतिकारक्षमता विकसित होत आहे. परिणामी मुख्य आणि दुय्यम किडींचा उद्रेक वाढत असल्याचे चित्र अनेक ठिकाणी दिसत आहे. या किडींच्या नियंत्रणासाठी जैविक घटकांचा वापर करण्याची आवश्यकता जागोजागी दिसून येत आहे. या अतिविषारी किटकनाशकांच्या अनियंत्रित वापरामुळे शेतीसाठी उपयोगी अशा अन्य मित्र कीटकांचा नाश झाल्याने नैसर्गिक नियंत्रण साखळी नष्ट होत आहे. जैविक किड नियंत्रण हा त्यासाठी एक महत्त्वाचा पर्याय आहे. आपल्याला बुरशी म्हटले की, दरवेळी पिकांवरील विविध रोगच आठवतात, पण त्या निसर्गामध्ये विविध पर्यावरणपूरक कामे करत असतात. यातीलच एक महत्त्वपूर्ण बुरशी म्हणजे मेटारायझियम अॅनिसोपिली. या बुरशीमुळे किटकांमध्ये ग्रीनमस्कार्डिन हा साथीचा रोग होतो. सदर बुरशी जवळपास २०० पेक्षा अधिक कीड प्रवर्गातील निरनिराळ्या किडींचे नियंत्रण करण्यास मदत करते.
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरीअंतर्गत येणारे कृषी महाविद्यालय, पुणे येथे अखिल भारतीय समन्वित जैविक किड नियंत्रण प्रकल्पांतर्गत डॉ. संतोष मोरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली विनय चव्हाण, सुदीप दळवे, रोहन नांदखिले व सहकारी विद्यार्थी याच बुरशीपासून एक जैविक कीडनाशक ‘फुले मेटार्हायझियम’ तयार करतात.
मेटार्हायझियमचा वापर शेतकरी फवारणी, जमिनीवर धुरळणी किंवा सेंद्रिय खतांसोबत मिसळून हुमणी अळी, पिठ्या ढेकूण, पांढरी माशी, मावा, फुलकिडे, तुडतुडे, इ. किडींच्या नियंत्रणासाठी करू शकतात. प्रामुख्याने ऊस, भात, भुईमूग, मका, बाजरी, इ. खरीप हंगामातील पिकांबरोबर विविध पालेभाज्या आणि फळबागांवर सुद्धा हे कीटकनाशक उपयुक्त आहे. मोठ्या प्रमाणावर नुकसान करणार्या हुमणी अळीच्या नियंत्रणासाठी मेटार्हायझियम हे प्रभावी जैविक कीटनाशक आहे. हुमणी अळी ही बहुभक्षी किड आहे. महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये, पावसाळ्यात ऊस पिकावर हुमणी अळीचा प्रादुर्भाव दिसून येतो आणि त्यामुळे ऊस पिकाच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणावर घट होत आहे. मेटार्हायझियमच्या संपर्कात आलेली हुमणी अळी साधारण १०-१५ दिवसांत मरते.
मेटार्हाझियम वापरायची पद्धत :
ऊस पिकासाठी प्रती हेक्टर १५-२० किलो फुले मेटार्हायझियम शेणखतात मिसळून शेतात टाकावे.
तसेच प्रति लिटर पाण्यात ५ ग्रॅम फुले मेटार्हिझियम मिसळून रान वापशावर असताना उसाच्या खोडात आळवणी करावी.
मेटार्हिझियम प्रकल्पाच्या अधिक माहितीसाठी डॉ. संतोष मोरे (७५८८९५५५०१, प्राध्यापक, कृषी महाविद्यालय पुणे) यांच्याशी संपर्क साधावा.