उष्णतेच्या लाटांबाबत प्रभावी जनजागृती आवश्यक – आयआयटी मुंबईचे प्रा.परमेश्वर उडमाले

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १४ फेब्रुवारी २०२३ । मुंबई । उष्णतेच्या लाटांपासून सुरक्षित राहण्यासाठी या लाटांबाबत पूर्व सूचना, संवेदनशील भागात नियोजन करणे आणि आणि प्रभावी जनजागृती करणे आवश्यक असल्याचे मत आयआयटी मुंबईचे प्रा.परमेश्वर उडमाले यांनी मांडले

पवई येथे ‘उष्णतेच्या लाटा राष्ट्रीय कार्यशाळा 2023 मध्ये उष्णतेच्या लाटांबाबत पूर्वसूचना, संवेदनशील भागात नियोजन करणे या चर्चासत्रात प्रा. परमेश्वर उडमाले बोलत होते. यावेळी ओडिशा, महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यातील प्रतिनिधींनी आपले या विषयाच्या अनुषंगाने सादरीकरण केले.

प्रा.परमेश्वर उडमाले म्हणाले की, विविधांगी स्वरूपात उष्ण लाटांचे प्रदेश आहेत, त्यांचा अभ्यास होणे गरजेचे आहे. यामध्ये अशा प्रदेशांची माहिती जमा करणे आवश्यक आहे. सामाजिक, आर्थिक आणि भौतिक अशा स्वरूपाच्या सगळ्या जगण्यावरती याचा परिणाम होत असतो. संवेदनशील भागात नियोजन करताना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले.

ओडिशा, महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्य आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यांनी आपल्या राज्यात उष्णतेच्या लाटांसाठी करीत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. तसेच कशाप्रकारे आगामी नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती दिली. जनजागृतीसाठी माहिती–शिक्षण-संवाद यातून लोकांना उष्णतेच्या कालावधीत होणारी हानी कशाप्रकारे कमी करता येईल, याची माहिती यावेळी दिली.

हवामान संकेतानुसार पिके घ्यावीत

जागतिक हवामान बदलामुळे वाढणाऱ्या उष्म लहरींचा परिणाम कृषी क्षेत्रावरही मोठ्या प्रमाणात होत आहे. म्हणून हवामान संकेतानुसार पिके घ्यावीत. पीक विमा घ्यावा, कमी पाण्यातील विविध पीक लागवड करावी, अशा उपाययोजना यावेळी सूचविण्यात आल्या.

अन्न सुरक्षा ही महत्त्वाची बाब असून, बदलत्या हवामानानुसार राष्ट्रीय मार्गदर्शक सूचनांचे पिकांची लागवड करताना पालन करावे असे सांगून डॉ. विनय सेहगल यांनी शेतीचे वाढत्या उष्म लहरींमुळे नुकसान होऊ नये यासाठी उपाययोजना सांगितल्या.

वाढत्या उष्णलहरींमुळे पाणी व ऊर्जाचे नियोजन कसे करावे याबाबत सीडीआरआय चे महासंचालक अमित प्रोथी यांनी माहिती दिली.


Back to top button
Don`t copy text!