
दैनिक स्थैर्य | दि. १८ फेब्रुवारी २०२५ | फलटण |
युवकांना अंधारातून प्रकाशाकडे नेणारे एकमेव साधन म्हणजे शिक्षण आहे. ग्रामीण भागातील युवकांनी शिक्षणाची कास धरावी. शिक्षणाने आपली सामाजिक उंची वाढते. यामुळे तरुणांनी शिक्षणावर भर देऊन स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून उत्तुंग यश संपादन केले पाहिजे. शेखर राजेंद्र कोरडे व अंकिता विशाल शिंदे या दोघांनी अतिशय संघर्ष करत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश संपादन केले आहे. या दोघांचा आदर्श गावातील इतरही तरुणांनी घेऊन विविध क्षेत्रात यश मिळवावे, असे प्रतिपादन विठ्ठलवाडी, ता. फलटण येथे शेखर कोरडे व अंकिता शिंदे यांच्या सत्कारप्रसंगी गिरीश बनकर यांनी केले.
यावेळी शेखर कोरडे व अंकिता शिंदे या दोघांचा सत्कार विठ्ठलवाडी ग्रामस्थांकडून करण्यात आला. याप्रसंगी लेखक विकास शिंदे, गोविंद भुजबळ, बापूराव शिंदे, विजय शिंदे, राहुल शिंदे, वैभव नाळे, अमोल रासकर, मयूर शिंदे, दत्तात्रय नाळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
सत्काराला उत्तर देताना अंकिता शिंदे यांनी सांगितले की, लग्न झाल्यावर दहावीनंतरचे शिक्षण घेतले. पतीच्या आग्रहास्तव महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करून एमपीएससीची परीक्षा दिली. दोन-तीन प्रयत्न केल्यानंतर हे यश मिळाले. कुटुंबीयांनी खूप साथ दिली. आपण आपल्या मुलीला शिकवतो, पण सुनेला कोण शिकवत नाही. मला माझ्या कुटुंबियांनी शिकवले, त्यांच्याबद्दल मला अभिमान आहे.
शेखर कोरडे यांनी आई-वडिलांचे छत्र लहानपणीच हरवलेले असताना चुलते व कुटुंबियांनी भावंडांसह शिक्षण दिले, कधीच आई-वडिलांची कमतरता जाणवू दिली नाही. म्हणून या सत्काराचे खरे हक्कदार तेच आहेत, असे सांगितले.
यावेळी दिगंबरदादा मेहेकरकर, अंकुश गायकवाड, नामदेव कोरडे, पोपट बोडके, जनार्धन बोराटे, दशरथ बनकर, ज्ञानदेव कोरडे, सोपान शिंदे, सचिन शिंदे, विशाल शिंदे आदी उपस्थित होते. प्रीतम कोरडे यांनी प्रास्ताविक केले, सुहास कोरडे यांनी आभार मानले.