दैनिक स्थैर्य । दि. २८ एप्रिल २०२२ । सातारा । सध्या राज्यामध्ये माकड चाळ्यांना उत आला आहे. माझा फेवरेट कार्टून शो टॉम अँड जेरी सोडून मी या माकड चाळ्यांचा आनंद घेत आहे. जी ईडी कोणाला माहित नव्हती त्याचा वापर सातत्याने होत आहे. त्यामुळे ईडीची अवस्था पानपट्टीवरच्या बिडी सारखी झाली आहे, असा घणाघात खासदार उदयनराजे भोसले यांनी सातार्यात केला.
एका खाजगी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत उदयनराजे भोसले यांनी आपली सडेतोड मते व्यक्त करत या विधानात द्वारे जणू भाजपला घरचा आहेर दिला. राज्यातील दिवसेंदिवस वादग्रस्त बदलत चाललेली राजकीय परिस्थिती महाविकास आघाडी आणि भाजप यांच्यातील सुरु असलेले आरोप प्रत्यारोप या विषयावर पत्रकारांनी उदयनराजेंना बोलते करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा उदयनराजे नेहमीप्रमाणे रोखठोक शैलीमध्ये व्यक्त झाले.
ते पुढे म्हणाले माझ्या हातात ईडी द्या म्हणजे मी दाखवतो सगळ्यांना. ईडी म्हणजे हा चेष्टेचा विषय झाला आहे. कोणी कोणावर सुड काढायचा राग व्यक्त करायचा आणि ईडीची भाषा बोलायची हे योग्य नाही. ईडी म्हणजे पानपट्टी वरील बिडी मिळतेना अशी त्याची अवस्था झाली आहे. आरोप-प्रत्यारोप करणाऱ्यांना सरळ ताब्यात घ्या आणि चाप लावावा म्हणजे सगळे सरळ होतील. अशांना दांडक्याने सडकून काढले पाहिजे असा थेट घणाघात खासदार उदयनराजे भोसले यांनी केला.
कोल्हापूर येथे राष्ट्रवादीच्या झालेल्या सभेवर सुद्धा त्यांनी कडाडून टीका केली. ते म्हणाले येथे सभेला बर्याच जणांची गर्दी होती. मात्र व्यक्त झालेल्यांचा पवित्रा काय होता ? यामध्ये सामान्यांचे प्रश्न सोडवण्याची भूमिका किती जणांनी मांडली? सर्वसामान्यांना वगळून जे राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत त्याला कुठलाही अर्थ नाही. सध्याची परिस्थिती इतकी कुणी बिघडवली याचा विचार झाला पाहिजे. कोण कोणाला आत टाकतोय ? कोण कोणावर आरोप करतोय ? काय बोलणार आता ? असे उदयनराजे म्हणाले.
काही लोकांनी पैसे खाल्ले आहेत. मग त्याचा सोक्षमोक्ष लावायलाच पाहिजे. माझ्या हातात द्या बघा कसं मी सरळ करतो ते. एका बाजूला लोक कसे जगत आहेत आणि हे मात्र एकमेकांची पाठ थोपटून जगत आहेत. दोन वर्ष जे जेलमध्ये होते त्यांनी काही केले नाही. आता जे जेलमध्ये आहेत त्यांनी काही केलेलं नाही. मग काय लोकांना डोळे मेंदू नाहीत असं वाटतंय काय ? निवडणुका लागल्या तर ही मंडळी ही निवडणुकीला उभी राहतील हे त्यांचे त्यांनाच माहीत अशी चिंता उदयनराजे यांनी व्यक्त केली.