नीरव मोदीला EDचा दणका, 329 कोटींची मालमत्ता केली जप्त


स्थैर्य, मुंबई, दि. 8 : पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार फरार हिरे व्यापारी नीरव मोदी याला आज सक्तवसुली संचालनालयाने दणका दिला आहे. नीरव मोदीची 329.66 कोटींची संपत्ती ‘ईडी’ने बुधवारी जप्त केली असून त्यात मुंबई, दुबई आणि लंडनमधील फ्लॅटचा समावेश आहे. अलिबागमधील फार्म हाऊसवरदेखील ईडीने टाच आणली आहे.

पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील प्रमुख आरोपी नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी या दोघांची जवळपास 1350 कोटींची संपत्ती जप्त करण्यात आली होती. गेल्या महिन्यात ‘ईडी’ने ही कारवाई केली होती. या संपत्तीमध्ये 2300 किलो पॉलिश हिरे, मोती आणि दागिन्यांचा समावेश आहे. नीरव आणि मेहुलने कथितरित्या हे हिरे-दागिने हाँगकाँगला पाठवले होते. तिथून हे भारतात परत आणण्यात आले आहेत.

मुंबईतील विशेष न्यायालयाने 8 जून रोजी झालेल्या सुनावणीत नीरव मोदीची स्थावर मालमत्ता जप्त करण्याचे आदेश ‘ईडी’ला दिले होते. त्यानुसार आज ‘ईडी’ने जप्तीची कारवाई केली आहे. वरळीतील ‘समुद्र महल’ या इमारतीतील नीरव मोदीच्या मालकीचा एक फ्लॅट जप्त करण्यात आला आहे. हा फ्लॅट चार फ्लॅट्सचा मिळून तयार करण्यात आला होता. याची किमत काही कोटींच्या घरात आहे. त्याशिवाय अलिबागमधील फार्म हाऊस आणि जमिनीवर ‘ईडी’ ने टाच आणली आहे. जैसलमेर येथील पवन चक्कीदेखील या कारवाईत जप्त करण्यात आली आहे. ईडीने लंडनमधील एक फ्लॅट, दुबईतील एक फ्लॅट जप्त केला आहे तसेच नीरव मोदींचे बँक खाते देखील गोठवण्यात आल्याचे ‘ईडी’ ने म्हटले आहे. या सर्वांचे मूल्य 329.66 कोटी आहे.

‘ईडी’द्वारे मनी लाँड्रिंग विरोधी कायाद्याद्वारे नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी या दोघांची चौकशी सुरू आहे. दोघांना यापूर्वीच फरार आरोपी म्हणून घोषित करण्यात आले आहे. मागील पाच वर्षात ईडीने आतापर्यंत नीरव मोदीची 2348 कोटींची संपत्ती जप्त केली आहे.

पंजाब नॅशनल बँक घोटाळा प्रकरणात नीरव मोदी याला विशेष ‘पीएमएलए’ न्यायालयाने यापूर्वीच परागंदा आर्थिक गुन्हेगार म्हणून घोषित केले आहे. न्यायालयाच्या परवानगीनं ईडीद्वारे मोदीची संपत्ती जप्त करण्यात आली होती. या जप्त केलेल्या 112 वस्तूंचा फेब्रुवारीत ऑनलाइन लिलाव करण्यात आला होता. यात एम. एफ. हुसेन, अम्रिता शेरगिल यांच्या दुर्मीळ चित्रांचा समावेश होता.15 महागडी पेंटिंग्जची किंमत 20 ते 30 कोटींच्या घरात होती.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!