
स्थैर्य, फलटण, दि. 8 ऑक्टोबर : दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर, येथील श्री सद्गुरू हरिबुवा महाराज शिक्षण संस्थेत पर्यावरणपूरक आकाश कंदील बनविण्याचा उपक्रम उत्साहात राबविण्यात आला. शिवम प्रतिष्ठानच्या घारेवाडी शाखेच्या वतीने आयोजित या कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी आपल्या कौशल्याने शेकडो आकाश कंदील तयार केले.
दिवाळीनिमित्त आकाश कंदील कसा बनवायचा, याचा प्रत्यक्ष अनुभव विद्यार्थ्यांना मिळावा या उद्देशाने, सुहास प्रभावळे यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. विद्यालयाच्या मल्टीपर्पज हॉलमध्ये झालेल्या या उपक्रमात मुलांना आकाश कंदील बनविण्याचे प्रात्यक्षिक प्रशिक्षण देण्यात आले. कार्यानुभव विषयांतर्गत कागदकाम आणि चिकटकाम कसे करावे, याचा अनुभव घेताना विद्यार्थ्यांमध्ये मोठा उत्साह दिसून येत होता.
कार्यक्रमाचे स्वागत सहकार महर्षी हणमंतराव हायस्कूलचे प्राचार्य नागेश पाठक यांनी केले, तर आनंदवन प्राथमिक विद्यामंदिरचे मुख्याध्यापक प्रदीप चव्हाण यांनी आभार मानले. यावेळी शिवम प्रतिष्ठानचे साधक आणि शिक्षक उपस्थित होते.