
दैनिक स्थैर्य । 3 मे 2025। सातारा । औंध येथील श्री भवानी वस्तू चित्र संग्रहालय व ग्रंथालयाच्या सर्वकष विकास कामांसाठी राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली व औंध संस्थानच्या गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यांच्या प्रयत्नातून सुमारे 52 कोटी सहा लाख 66 हजार 853 रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या माध्यमातून सर्व सोयींनीयुक्त संग्रहालयाची नूतन इको फ्रेंडली इमारत साकारण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
पर्यटकांना भुरळ घालणार्या औंधच्या संग्रहालयाच्या विस्तारित इमारतीचे काम भव्य व देखणे सर्व सोयींनी युक्त करण्याचा गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यांचा मानस आहे. त्यादृष्टीने त्यांचे प्रयत्न सुरू असून यामुळे औंधच्या सांस्कृतिक वैभवात भर पडणार असून कलाकारांच्या कलाकृतींना याठिकाणी वाव मिळणार आहे. औंध संस्थान देशातील नावाजलेले संस्थान होते. औंध संस्थानचे अधिपती कै. श्रीमंत भवानराव उर्फ बाळासाहेब पंतप्रतिनिधी यांनी 1937-38 मध्ये अथक परिश्रम करून मूळपीठ डोंगराच्या मध्यवर्ती ठिकाणी श्री भवानी वस्तू चित्र संग्रहालय व ग्रंथालयाची उभारणी केली होती. त्यानंतर 1952 मध्ये श्रीमंत भवानराव पंतप्रतिनिधी यांनी हे संग्रहालय शासनाच्या ताब्यात दिले. त्याकाळी उभारण्यात आलेले औंधचे संग्रहालय आज दुर्मिळ, देदिप्यमान कलाकृती व वस्तूंच्या संग्रहामुळे पर्यटक, इतिहास संशोधकांचे आवडीचे ठिकाण बनले आहे.
औंधचे संग्रहालय म्हणजे दुर्मिळ शिल्पाकृती, पेंटींग्ज, हस्तीदंती व चंदनी लाकडातील कोरीव काम केलेल्या कलाकृती, देशी परदेशी वस्तू, संगमरवरी मूर्ती, वस्तू, त्याचबरोबर दुर्मिळ ग्रंथसंपदा याठिकाणी उपलब्ध आहे. या ठिकाणी असणार्या कलाकृतींच्या मांडणी शास्त्रीय पद्धतीने करण्यासाठी तसेच कलाकारांच्या कलेला वाव मिळावा यासाठी भव्य व देखणी संग्रहालय इमारत, परिसरात सुंदर बगीचा, विश्रामगृह, कर्मचारी निवासस्थाने, संरक्षक यंत्रणा उभारणी करणे, त्याचबरोबर उच्च दर्जाचे सीसीटीव्ही कॅमेरे, सोलर रूफ आदी कामे या माध्यमातून केली जाणार आहेत. त्यामुळे पुढील काळात औंधचे पर्यटन बहरण्यास निश्चित मदत होणार आहे. येत्या काही वर्षांत औंधची एक वेगळी ओळख निर्माण होणार आहे.
औंधच्या धार्मिक, पर्यटन विकासासाठी गायत्री देवी पंतप्रतिनिधी मागील 24 वर्षांपासून कार्यरत आहेत. मागील वर्षी येथील ऐतिहासिक पद्माळे, नागाळे तळ्यांच्या सुशोभिकरणासाठी 39 कोटी रुपयांचा निधी आणला आहे. त्या माध्यमातून हे कामही प्रगतीपथावर आहे. यावर्षी संग्रहालय इमारत कामासाठी 52 कोटी असा सुमारे एकूण 91 कोटी रुपयांचा निधी आणला आहे. यासाठी उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांचे मोलाचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले असून यापुढील काळातही आँधसह परिसरात विकासकामे मोठ्या प्रमाणात राबविण्याचा निर्धार गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यांनी केला आहे. याअगोदर मूळपीठ डोंगर शिखर जिर्णोद्धार, दीपमाळ दुरुस्ती व अन्य अनेक कामे त्यांनी केली आहेत. दरम्यान, 2005 ते 2007 मध्ये संग्रहालयाची गरज ओळखून त्यावेळीही उपमुख्यमंत्री ना. अजित पवार व गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यांनी सुमारे एक कोटी 82 लाखांचा निधी इमारत कामासाठी उपलब्ध करून दिला होता.