स्थैर्य, सातारा, दि. 24 : राज्यसभेच्या खासदारपदाची शपथ घेतल्यानंतर दुसर्याच दिवशी केंद्रीय रेल्वे मंत्रालयाच्या केंद्रीय सदस्यपदी निवड झालेल्या खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांचे आज सातारा येथील पोवई नाक्यावर फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोषात स्वागत करण्यात आले.
खा. उदयनराजे भोसले यांना गुरुवारी दिल्ली येथील संसदेच्या सभागृहात सभागृहाचे अध्यक्ष व उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी पद व गोपनीयतेची शपथ दिली होती. त्यानंतर त्यांच्या भाजप नेत्यांशी मॅरेथॉन बैठका झाल्या होत्या. शपथविधीच्या दुसर्याच दिवशी म्हणजेच गुरुवारी केंद्र शासनाने खा. उदयनराजे भोसले यांची केंद्रीय रेल्वे मंत्रालयाच्या केंद्रीय सदस्यपदी निवड केली होती. निवड झाल्यानंतर आज शुक्रवार, दि. 24 रोजी खा. उदयनराजे भोसले यांचे दुपारी 1.30 वाजता पोवई नाका येथे आगमन झाले. तेथे उदयनराजे भोसले मित्र समूहाने फटाक्यांची आतिषबाजी करत त्यांचे जल्लोषात स्वागत केले. स्वागतानंतर उदयनराजे भोसले यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन केले. तेथून उदयनराजे भोसले जलमंदिर या आपल्या निवासस्थानाकडे रवाना झाले. त्यांच्या वाहनाच्या पाठीमागे सुमारे 30 ते 40 वाहनांचा ताफा होता. जलमंदिर येथे पोहोचतात उदयनराजे सातारा शहरातील वैद्यकीय अधिकार्यांच्या आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत सहभागी झाले.