दैनिक स्थैर्य | दि. २१ जून २०२३ | सातारा |
सातारा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नूतन जागेतील इमारतीच्या भूमिपूजनप्रसंगी आ. शिवेंद्रसिंहराजे व खा. उदयनराजे पुन्हा एकदा आज आमने-सामने आले. यावेळी दोन्ही राजांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा होण्याचा प्रसंग उद्भवला होता; परंतु पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणल्याने ही वेळ टळली. मात्र, यावेळी काही काळ तणाव निर्माण झाला होता. दोन्ही राजांनी या जागेवर आपला कब्जा दाखविल्याने वाद निर्माण झाला होता. दोन्ही गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याने येथील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना मोठी कसरत करावी लागली.
सातारा कृषी उत्पन्न बाजार समितीवर आ. शिवेंद्रसिंहराजे गटाची सत्ता आहे. या बाजार समितीच्या नूतन जागेतील इमारतीचा भूमिपूजनाचा कार्यक्रम आज आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या हस्ते होणार होता. ही जागा पुणे-बेंगलोर हायवेवर शिवराज ढाब्याशेजारी असून ही जागा राज्य सरकारकडून सातारा कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी मंजूर झाल्याचे आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी यावेळी सांगितले. मात्र, ही जागा आमच्या मालकीची असल्याचे खा. उदयनराजे यांचे म्हणणे आहे. तसेच या जागेवर सातारा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या होणार्या नवीन इमारतीच्या बांधकामावर कोर्टाने स्टे आणल्याचे खा. उदयनराजे यांचे म्हणणे आहे. याच कारणावरून आज दोन्ही राजे भूमिपूजनप्रसंगी आमने-सामने आले. दोन्ही राजांमध्ये काही वेळ शाब्दिक चकमक उडाली. खा. उदयनराजे यांनी यावेळी सातारा कृषी उत्पन्न बाजार समितीचे तात्पुरते उभे केलेले नवीन ऑफीस उद्ध्वस्त केले. मात्र, अशा तणावपूर्ण परिस्थितीतही आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी नारळ वाढवून भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पाडला. त्यानंतर खा. उदयनराजे यांनी पोलिसांवर पक्षपातीपणाचा आरोप करून आ. शिवेंद्रसिंहराजे व कार्यकर्त्यांवर कारवाई करण्याची मागणी केली.
यावेळी आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी ही जागा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नवीन इमारतीसाठी राज्य शासनाकडून मंजूर झाली असून त्यानुसार आपण हे भूमिपूजन करून या कामास प्रारंभ करत आहे. मात्र, खा. उदयनराजे जाणूनबुजून या कामात खोडा घालत असल्याचा आरोप केला आहे.
खा. उदयनराजे यांनीही सातारा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उभे केले असून बाजार समितीचा सचिव २ कोटींचा बंगला कसा काय बांधतो, असा प्रश्न त्यांनी विचारला आहे. सचिवावर भ्रष्टाचाराचे आरोप सिध्द होऊनही तो त्याच पदावर आजपर्यंत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
सातारा कृषी उत्पन्न समितीच्या नूतन इमारतीच्या भूमिपूजन कार्यक्रमाच्या वादातून आज दोन्ही राजे आमने-सामने आल्याने त्यांच्यातील सत्तासंघर्ष पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सातारकरांना दोन्ही राजांमधील संघर्ष पाहायला मिळणार, हेच आजच्या घटनेवरून स्पष्ट झाले आहे.