
दैनिक स्थैर्य | दि. १५ मार्च २०२३ | फलटण |
माढा लोकसभा मतदारसंघाचे पाणीदार जलनायक, खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची मंगळवारी देशाच्या जलशक्ती मंत्रालयाच्या अंतर्गत पाणी वाटप पॉलिसी ठरवणार्या कमिटीवर विशेष निमंत्रित सदस्यपदी निवड झाली आहे.
देशाच्या शेतीपाण्याच्या प्रश्नावर विविध धोरणे ठरवणे, यामध्ये नदीजोड प्रकल्प, धरणे, पाण्याचे स्त्रोत ठरवणे, ग्रामीण भागातल्या शेतकर्यांना तसेच पिण्याच्या पाण्याच्या योजना ठरवणे, जलजीवन मिशनअंतर्गत देशाच्या कानाकोपर्यामध्ये ‘हर घर जल’ ही योजना राबवणे, दुष्काळी पट्ट्यातील जनतेला शेती पाण्यासाठी नदीजोड प्रकल्पाचा अभ्यास करणे, ज्यादा पाऊस झाल्यानंतर वाहून जाणार्या पाण्यावर अभ्यास करून ते कशा पद्धतीने पाणी वापरता येईल यावर अभ्यास करणे, केंद्र व राज्य यांच्यामध्ये समन्वय ठेवून पाण्याची धोरणे ठरवणे, असे अनेक महत्त्वाचे निर्णय घेणे, अशा कमिटीवर खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची निवड केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी केली. याबाबतचे शासन स्तरावरचे सर्व आदेश निघाले आहेत.
या निवडीमुळे महाराष्ट्रातील दुष्काळी तालुक्याला नक्कीच याचा फायदा होईल. माढा मतदारसंघातील पिण्याच्या पाण्याच्या व शेती पाण्याचे जे उर्वरित प्रश्न राहिलेले आहेत ते सुद्धा यानिमित्ताने निकाली निघतील. या निवडीमुळे मतदार संघातील जनतेमध्ये आनंदाचे वातावरण आहे, अशी माहिती सातारा जिल्हा भारतीय जनता पक्षाचे सरचिटणीस जयकुमार शिंदे यांनी दिली.