स्थैर्य, कराड, दि. 24 : अयोध्या येथील प्रभू रामचंद्रांच्या मंदिर निर्माणाचा शुभारंभ 5 ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलेल्या विधानावर भाजपने जोरदार टीका केली आहे. यानंतर कराड येथे भाजप युवा मोर्चाच्यावतीने खा. शरद पवारांना जय श्री राम लिहिलेली पत्रे पाठवत अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्यात आले.
भाजयुमो महाराष्ट्राचे सचिव सुदर्शन पाटसकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या अनोख्या आंदोलनात पदाधिकार्यांसह कार्यकर्त्यांनी सहभागी होत कराड येथील पोस्ट कार्यालयासमोरील टपाल पेटीमध्ये खा. शरद पवार यांच्या नावे जय श्रीराम लिहिलेली पत्रे टाकली.
सुदर्शन पाटसकर म्हणाले, खा. शरद पवार यांनी नुकतेच एक विधान केले, की प्रभू श्रीरामांचे मंदिर बांधून कोरोना जाणार नाही. त्यांना एका गोष्टीची भूल पडली आहे प्रभू श्रीरामचंद्रांच्या नावाचा त्यांना विसर पडला आहे, हे सर्व तमाम राम भक्तांना जाणवले आहे. प्रभू श्रीरामांची आठवण करून देण्यासाठी भारतीय जनता युवा मोर्चा प्रदेश अध्यक्ष विक्रांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातून जय श्रीराम लिहिलेली 10 लाख पत्रे खा. शरद पवार यांना पाठवण्यात येणार आहेत. याची सुरुवात आज सातारा जिल्ह्यातील कराड शहरामधील पोस्ट ऑफिसमध्ये पत्र पाठवून करण्यात आली. कराड येथे नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून येत्या दोन दिवसात सातारा जिल्ह्यातून हजारो पत्रे पाठविण्याचा संकल्प आहे.