दैनिक स्थैर्य । दि. २२ सप्टेंबर २०२१ । सातारा । सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी तयार केलेल्या कच्चा मतदार यादीत माढा लोकसभा मतदार संघाचे खा. रणजितसिंह नाईक – निंबाळकर, माण विधानसभा मतदार संघाचे आ. जयकुमार गोरे यांचे पाणीपुरवठा मतदारसंघातील ठराव जिल्हा बँकेने अपात्र यादीत टाकले होते. दरम्यान या दोघांनी विभागीय सहनिबंधकाकडे हरकत दाखल केली होती. त्यावर आज सुनावणी होऊन दोघांचे ठराव पात्र ठरविले आहेत. त्यामुळे रणजितसिंह नाईक- निंबाळकर व जयकुमार गोरे यांना रोखण्याचे राष्ट्रवादीने त्यांचे मनसुबे फोल ठरले असल्याचे मानण्यात येते.
याबाबत मिळालेली माहिती अशी, सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीसाठी मतदार यादी अंतिम करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. यामध्ये १९६३ मतदारांची कच्ची यादी बँकेने तयार करून ती सहनिबंधक कार्यालयास पाठवली होती. ही यादी प्रसिद्ध करून त्यावर आक्षेप व हरकती मागवल्या होत्या. कच्चा यादीवर ४६ दाखल करण्यात आल्या होत्या यामध्ये खा. रणजितसिंह नाईक- निंबाळकर आणि आ. जयकुमार गोरे यांच्या नावाचे पाणीपुरवठा संस्थेतील ठराव बँकेने अपात्र यादी टाकले होते. त्यावर दोन्ही विद्यमान नेत्यांनी आक्षेप घेतला होता. त्यांनी याबाबत विभागीय सहनिबंधकाकडे हरकती दाखल केल्या होत्या त्यावर सुनावणी होऊन दोन्ही ठराव पात्र ठरवत मतदार यादीत समाविष्ट केले आहेत. त्यामुळे नाईक- निंबाळकर व गोरे यांना दिलासा मिळण्यास मदत झाली.