आद्य क्रीडा पत्रकार हरपला – सुधीर मुनगंटीवार यांची वि.वि. करमरकर यांना श्रद्धांजली


दैनिक स्थैर्य । दि. ०७ मार्च २०२२ । मुंबई । “वि.वि. करमरकर यांच्या निधनाने मराठी पत्रकारितेतील आद्य क्रीडा पत्रकार आणि एक चांगला क्रीडा समीक्षक हरपला आहे,” अशा शब्दात सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी वि.वि. करमरकर यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे.

टीव्ही नसलेल्या काळात त्यांची क्रीडा वार्तापत्रे गावोगावी लोकप्रिय होती, ती अजूनही लक्षात आहेत, असे सांगून श्री.मुनगंटीवार म्हणाले की, मराठी पत्रकारितेत क्रीडा क्षेत्राला महत्त्व मिळवून देण्यात वि.वि. करमरकर यांचा सिंहाचा वाटा आहे. ज्या काळात मराठी पत्रकारितेत क्रीडा क्षेत्र दुर्लक्षित होते, तेव्हा वि.वि. करमरकर यांची महाराष्ट्र टाइम्सच्या शेवटच्या पानावर प्रकाशित होणारी क्रीडा वार्तापत्रे इतकी लोकप्रिय झाली की अन्य मराठी वर्तमानपत्रांनी क्रीडा विषयक पान सुरू केले. वि.वि. करमरकरांचे वैशिष्ट्य हे की ते क्रिकेटपुरते थांबले नाहीत तर इतर सर्व खेळांनाही त्यांनी वृत्तपत्रात तितकेच महत्त्व प्राप्त करून दिले, असे श्री. मुनगंटीवार म्हणाले.

वि.वि. करमरकरांची आकाशवाणीवरील क्रीडा समालोचनही तितकेच लोकप्रिय झाले होते, असे सांगून मंत्री श्री.मुनगंटीवार म्हणाले की, क्रीडा पत्रकारितेला मराठी वृत्तपत्र सृष्टीत करमरकरांनी प्रतिष्ठा प्राप्त करून दिली. स्वतः समाजवादी असले तरी क्रीडा क्षेत्रातील त्यांच्या पत्रकारितेपासून त्यांचे राजकीय विचार वेगळे राखण्याचा त्यांनी प्रयत्न केला. आज वि.वि. करमरकरांच्या मृत्यूने आपण एक समर्पित क्रीडा समालोचक गमावला आहे. ईश्वर त्यांना सद्गती देवो आणि त्यांच्या कुटुंबीय व चाहत्यांना या दुःखातून सावरण्याचे बळ देवो, अशी प्रार्थनाही मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी केली आहे.


Back to top button
Don`t copy text!