
स्थैर्य, सासकल, दि. ०५ सप्टेंबर : शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असलेली ‘ई-पीक पाहणी’ शेतकऱ्यांना सहजपणे करता यावी, या उद्देशाने सासकल, ता. फलटण येथे थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रात्यक्षिकाद्वारे माहिती देण्यात आली. यावेळी शेतकरी मोहन मुळीक यांच्या शेतातील फळ पिकाची नोंदणी ‘ई-पीक पाहणी’ मोबाईल ॲपमध्ये यशस्वीरीत्या करण्यात आली.
या उपक्रमावेळी ‘कृषी सेवा रत्न’ सचिन जाधव यांनी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, “शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील पिकांची नोंदणी ई-पीक पाहणी ॲपद्वारे करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. या नोंदणीमुळेच पीक कर्ज, फळपीक कर्ज, पीक विमा आणि इतर शासकीय योजनांचा लाभ घेणे शक्य होते.”
खरीप हंगाम २०२५ साठी ई-पीक पाहणी करण्याची अंतिम मुदत १५ सप्टेंबर २०२५ आहे. सर्व शेतकऱ्यांनी गुगल प्ले स्टोअरवरून ‘DCS’ मोबाईल ॲपचे नवीन व्हर्जन घेऊन वेळेपूर्वी आपल्या पिकांची नोंदणी करावी, असे आवाहनही सचिन जाधव यांनी केले. या उपक्रमाला गावातील शेतकऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिला.