दैनिक स्थैर्य | दि. २६ सप्टेंबर २०२३ | फलटण |
शासकीय योजनांचा लाभ अगर शासनाकडून होणारी मदत मिळविण्यासाठी शेतकर्यांनी ई- पीक पाहणी करून घ्यावी, असे आवाहन फलटणचे प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी भाडळी बु. येथे केले.
शेतकरी संवाद कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. शेतकरी अनुदान, नुकसान भरपाई तसेच पिक कर्जपुरवठासंबंधी शेतकर्यांनी ई-पीक पाहणी करणे अत्यावश्यक असून पिकाची नोंदणी नसल्यास वरील योजनांचा लाभ मिळणे अशक्य होते. याकरिता शेतकर्यांनी स्वतःच्या शेतीमध्ये असणार्या पिकांची नोंद ताबडतोब करुन घेण्याचे आवाहन त्यांनी केले.
यावेळी फलटणचे तहसीलदार डॉ. श्री. अभिजीत जाधव यांनी शासकीय योजनांची माहिती देऊन महसूल विभागातील तलाठी, मंडल अधिकारी, पोलीस पाटील व कर्मचारी यांच्या सहकार्याने शेतीसंबंधांचे प्रश्न सोडवून घ्यावेत, असे आपल्या मनोगतामध्ये सांगितले.
शेतकरी संवाद कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रथमच भाडळी बु. येथे आलेल्या प्रांताधिकारी सचिन ढोले आणि तहसीलदार डॉ. अभिजीत जाधव यांच्या हस्ते सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने प्रतिष्ठापना केलेल्या श्री गणेशाची आरती घेण्यात आली. गेली तीस वर्षे ‘एक गाव एक गणपती’ या उपक्रमाचे दोन्ही अधिकार्यांनी कौतुक केले. गावातील सर्व तरुणांनी एकत्र येऊन असे उपक्रम राबवणे निश्चितच कौतुकास्पद असून पंचक्रोशीतील सार्वजनिक तरुण मंडळांनी याचा आदर्श घ्यावा, असे ते म्हणाले.
गणेशोत्सव काळामध्ये होणार्या सांस्कृतिक, आध्यात्मिक व इतर कला गुणदर्शन कार्यक्रमाची माहिती घेऊन कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी फलटण तालुका कृषी अधिकारी श्री. सागर डांगे यांच्या वतीने अधिकार्यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी पोलीस पाटील हनुमंत सोनवलकर, भाडळी बु. ग्रामपंचायत, विकास सोसायटीचे आजी-माजी पदाधिकारी, ज्येष्ठ नागरिक तसेच ग्रामस्थ आणि तरुण कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्ञानेश वारकरी गुरुकुल शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ह.भ.प. श्री. स्वप्निल महाराज शेंडे यांनी केले. मातोश्री विकास सेवा सोसायटी भाडळी बु.चे चेअरमन श्री. मोहनराव डांगे यांनी प्रास्ताविक केले. श्री. अनिकेत डांगे यांनी आभार मानले.