ई-पीक पाहणी शेती व शेतकऱ्यांच्या हिताची, सर्वांनी ई – पीक पाहणी नोंदणी करावी : प्रांताधिकारी सचिन ढोले

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ०१ जुलै २०२३ । फलटण ।

ई – पीक पाहणी द्वारे विविध पिकांखालील क्षेत्राची निश्चित माहिती झाल्याने कृषी विषयक धोरणे ठरविणे, त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी आणि शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळण्यास मदत होणार असल्याचे निदर्शनास आणून देत शेतकऱ्यांनी मोबाईल ॲप द्वारे प्रत्यक्ष शेतावर जावून ई – पीक पाहणी नोंदणी करावी असे आवाहन प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी केले आहे.

चित्रात वृक्षारोपण करताना मान्यवर.

कृषी दिन, कृषी संजीवनी सप्ताह समारोप, जोशी हॉस्पिटल प्रा. लि., फलटणच्यावतीने शेतकऱ्यांना आंबा व नारळ रोप वाटप आणि ई – पीक पाहणी नोंदणी प्रशिक्षण कार्यशाळा अशा संयुक्त कार्यक्रमात मार्गदर्शन करताना प्रांताधिकारी सचिन ढोले बोलत होते. यावेळी तहसीलदार डॉ. अभिजित जाधव, डॉ. प्रसाद जोशी, महसूल मंडलाधिकारी प्रकाश नाळे, तलाठी संघटनाध्यक्ष व धुमाळवाडीचे तलाठी लक्ष्मण अहिवळे, मंडळ कृषी अधिकारी अमोल सपकाळ, कृषी सहाय्यक सचिन जाधव, धुमाळवाडी व पंचक्रोशीतील शेतकरी आणि तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.  शेतकऱ्यांना केंद्र व राज्य शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान आणि नमो महासन्मान योजना मधून प्रत्येकी ६ हजार रुपये याप्रमाणे प्रतीवर्षी १२ हजार रुपये मिळणार असल्याचे निदर्शनास आणून देताना फलटण येथे कृषी विभागाचे कार्य  उत्कृष्ट असल्याचे आणि जोशी हॉस्पिटल मार्फत आंबा व नारळ रोप वाटप उपक्रम स्तुत्य असल्याचे प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी सांगितले.

शेतकरी व फार्मर प्रोड्युसर कंपनी यांनी एकत्र येऊन फळ प्रक्रिया उद्योगाची उभारणी केल्यास फळांवर प्रक्रिया करुन उत्पादित ज्यूस, जाम, जेली आणि फळ ड्राय आदी उत्पादनाद्वारे फळ उत्पादक शेतकऱ्यांना फळ बागेतून अधिक पैसा मिळविता येऊ शकतो याची ग्वाही देत येथील फळ उत्पादक शेतकऱ्यांनी याबाबत प्राधान्याने प्रयत्न करावेत असे आवाहन तहसीलदार डॉ. अभिजीत जाधव यांनी केले.

शेतकऱ्यांनी आपले आरोग्य चांगले राखण्यासाठी योग्य आहार, नियमीत योगासन व व्यायाम तसेच पुरेशी झोप घेतल्यास दवाखान्यात जाण्याची आवश्यकता नसल्याचे सांगताना जोशी हॉस्पिटल प्रा. लि., फलटणच्या माध्यमातून लोकोपयोगी विविध उपक्रम राबविण्यात येतात त्यामध्ये शेतकऱ्यांसाठी गेली ४ वर्षे कृषि दिनानिमित्त फळांची कलमे व रोपे वाटप करत असल्याचे यावेळी डॉ. प्रसाद जोशी यांनी सांगितले.     आपल्या कुटुंबाची फळांची गरज भागविण्यासाठी आणि निसर्ग व पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी शेतकऱ्यांनी वृक्षारोपण व वृक्ष संवर्धनाला प्राधान्य द्यावे यासाठी हा उपक्रम राबवीत असल्याचे तसेच जागतिक तापमान वाढीमुळे अवेळी पाऊस, गारपीट व वादळी वारे आणि बदलते निसर्गचक्र सुधारणे यासाठी वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन आवश्यक असल्याचे डॉ. प्रसाद जोशी यांनी आवर्जून सांगितले.

यावर्षी वाटप केलेल्या वृक्ष रोपांची योग्य जोपासना करणाऱ्या शेतकरी व ग्रामस्थांना पुढील वर्षी आणखी वृक्ष रोप वाटप करणार असल्याचे डॉ. प्रसाद जोशी यांनी सांगितले. प्रारंभी मंडळ कृषि अधिकारी विडणी अमोल सपकाळ यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत केल्यानंतर प्रास्ताविकात कृषि विभागाच्या विविध योजना, कृषी दिन आणि दि. २५ जून ते दि. १ जुलै दरम्यान कृषी संजीवनी योजनेंतर्गत राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांची माहिती देत कृषी संजीवनी सप्ताह समारोप  बाबत माहिती दिली. यावेळी  जोशी हॉस्पिटल प्रा. लि., फलटण मार्फत  महादेव मंदिर आणि हणमंत शिंदे या शेतकऱ्याच्या घर परिसरात प्रांताधिकारी सचिन ढोले, तहसीलदार डॉ. अभिजीत जाधव, डॉ. प्रसाद जोशी, तलाठी लक्ष्मण अहिवळे, मंडळ कृषी अधिकारी अमोल सपकाळ, कृषी सहाय्यक सचिन जाधव यांच्या हस्ते सोनचाफा आणि आंबा व नारळ वृक्षारोपण करण्यात आले, तसेच १५० शेतकऱ्यांना जोशी हॉस्पिटल प्रा. लि., फलटणच्यावतीने आंबा, नारळ रोप वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन, समारोप व आभार कृषी सहाय्यक सचिन जाधव यांनी मानले.


Back to top button
Don`t copy text!