स्थैर्य, दि.२२: कर्नाटकातील शिवमोगा येथे गुरुवारी रात्री साडेदहाच्या सुमारास डायनामाइटचा स्फोट झाला, त्यात 8 कामगार ठार झाले. मुख्यमंत्री बीएस येदियुरप्पा यांनी उच्चस्तरीय तपासाचे आदेश दिले आहेत. शुक्रवारी सकाळी पोलिस आणि अधिकाऱ्यांची टीम घटनास्थळ हुनासोडू गावात पोहोचली. संपूर्ण परिसर सील करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दगड फोडण्यासाठी विस्फोटक (जिलेटिन स्टिक्स) नेले जात होते. तेव्हाच शिवमोगा येथील अब्बलगेरे गावाजवळ स्फोट झाला. हा स्फोट इतका मोठा होता की त्याचा आवाज शिवमोगा जवळचा जिल्हा चिकमगलूरपर्यंत गेला आणि आजूबाजूच्या भागात भूकंपसदृश धक्के जाणवले.
काही लोकांचा दावा आहे की, एकानंतर एक 50 डायनामाइट ब्लास्ट झाले. स्फोटाच्या आवाजाने आजुबाजूच्या घराच्या काचा फुटल्या. लोकांना वाटले की, भूकंप आला आहे. यामुळे लोक घाबरुन घरातून बाहेर निघाले. 8-10 किमी पर्यंत स्फोटकांचा गंध देखील जाणवला. शिवमोगा हा कर्नाटकचे मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा यांचा मूळ जिल्हा आहे.
संपूर्ण परिसरात बंदोबस्त
शिवमोगा ग्रामीणचे आमदार अशोक नाईक म्हणाले की, सर्वत्र धूर होता. काहीही दिसत नव्हते. शिवमोगाचे उपायुक्त के.बी. शिवकुमार म्हणाले की, संपूर्ण परिसरात पोलिस बंदोबस्त आहे. घटनास्थळावर अजुन काही स्फोटक असल्याची भीती त्यांनी व्यक्त केली आहे.
पंतप्रधानांनी शोक व्यक्त केला
शिवमोगा दुर्घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोशल मीडियावर लिहिले की, ‘लोकांनी प्राण गमावल्याने मी दु: खी आहे. मी त्यांच्या कुटुंबियांसोबत माझ्या संवेदना आहेत. जखमी लवकर बरे व्हावेत अशी मी प्रार्थना करतो. राज्य सरकार लवकरच या दुर्घटनेमुळे नुकसान झालेल्यांना मदत करेल. ‘