दैनिक स्थैर्य । दि. १३ मार्च २०२२ । फलटण । फलटण तालुक्यात पोलीस पाटील भरती प्रक्रिया सुरु असून आज दि. १३ रोजी येथील मुधोजी हायस्कुल मध्ये सी. सी. टी. व्ही. कॅमेऱ्याच्या निगराणीत लेखी परीक्षा शांततेत, सुरळीत पार पडल्याची माहिती प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप यांनी दिली आहे. फलटण तालुक्यातील ३५ गावात पोलीस पाटील पदे रिक्त असून या सर्व गावातील पोलीस पाटील पदे परीक्षेद्वारे भरण्यात येणार आहेत, त्यासाठी आरक्षणे निश्चित करुन उमेदवारी अर्ज दाखल करणे, दाखल अर्जांची छाननी प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. ३५ पैकी ६ गावांसाठी एकही अर्ज दाखल झाला नाही, उर्वरित २९ गावांसाठी २१४ अर्ज दाखल झाले असून १९ अर्ज अवैध १९५ अर्ज वैध ठरले आहेत.
आज दि. १३ रोजी मुधोजी हायस्कूल, फलटण येथे लेखी परीक्षा घेण्यासाठी नियोजन करण्यात आले होते, तथापी एकूण पात्र १९५ उमेदवारांपैकी १९३ उमेदवारांनी आज परीक्षा दिली. या परीक्षेसाठी
बहुपर्यायी प्रश्न पत्रिका काढण्यात आली होती, ४ पैकी १ बरोबर उत्तरावर खूण करावयाची होती. OMR पद्धतीने ही ८० मार्कांची परीक्षा घेण्यात आल्याचे प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप यांनी निदर्शनास आणून दिले आहे. दि. १४/०३/२०२२ रोजी सायंकाळी ५ वा मुलाखतीसाठी पात्र उमेदवारांची यादी लावण्यात येईल. दि. १६ रोजी मुलाखती (तोंडी परीक्षा) घेवून लगेच निकाल जाहीर करण्यात येणार असल्याचे प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप यांनी निदर्शनास आणून दिले आहे. कुरवली खु|| (अनु. जमाती सर्वसाधारण), ठाकुरकी व भाडळी बु|| (अनु. जमाती महिला), कोराळे व कोपर्डे (भटक्या जमाती (ड) महिला), जाधववाडी (फ)(विशेष मागास प्रवर्ग महिला) या ६ गावातून एकही अर्ज न आल्याने सदर गावातील पोलीस पाटील पदे रिक्त राहणार आहेत.