लॉक डाऊनच्या काळात माजी मंत्री महादेव जानकर करीत आहेत कार्यकर्त्याच्या शेतातील कामे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, फलटण : करोना या संसर्गजन्य आजारांचा प्रादुर्भाव वाढत असताना, राज्यात बऱ्याच राजकीय घडामोडी घडत आहेत, मात्र राज्याचे माजी मंत्री आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर  आपल्या कार्यकर्त्यांच्या घरी गेले २५ दिवस मुक्कामाला आहेत. या कालावधीत कार्यकर्त्याच्या शेतामध्ये राबताना दिसून येत आहेत. दररोज बैलगाडी मध्ये बसून कार्यकर्त्यांच्या शेतात जातात, तेथे तण काढतात, औत धरण्याचे काम करीत आहेत. ५ वर्षे युतीच्या राज्यात कॅबिनेट मंत्रीपद उपभोगल्यानंतर पुन्हा सत्तेच्या आसपास राहण्याच्या प्रयत्नापेक्षा माजी मंत्री आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर त्याला अपवाद ठरत आहेत. अनेक नेते मंडळी सत्तेच्या आसपास राहण्यासाठी सतत सेटिंग लावण्याच्या प्रयत्नात असतात मात्र महादेव जानकर कार्यकर्त्यांच्या घरी, त्याच्या कुटुंबात राहुन आपले वेगळेपण जपत आहेत.

सामान्य शेतकऱ्याप्रमाणे शेतात तण काढण्यापासून ते औत धरण्यापर्यंतची सर्व कामे जानकर करत आहेत. त्याचबरोबर ध्यानधारणा, योग साधना व वाल्मिकी रामायण यासारखी पुस्तके वाचण्यात आपला लॉक डाऊन मधील कालावधी घालवत आहेत. महादेव जानकर गेल्या सुमारे महिन्यापासून गुंठेगाव, ता. गेवराई, जि. बीड येथे आले आहेत. त्यांच्या पक्षाचे जिल्हाध्यक्ष परमेश्वर वाघमोडे यांच्याकडे ते उतरले आहेत. मात्र कार्यकर्त्याच्या घरी आल्याने ते स्वस्थ बसलेले नाहीत. लॉक डाऊनमुळे गुंठेगावात अडकून पडावे लागल्याने जानकर हे सध्या वाघमोडे यांच्या शेतात राबत आहेत. वाघमोडे यांच्या शेतात ते पहाटेच जातात. औत ओढण्यापासून ते शेतातील तण काढण्यापर्यंतची कामं ते करत आहेत. या शिवाय सीताफळाची लागवड असो की घरात पाणी भरणे असो कोणताही अविर्भाव न ठेवता ते ही सर्व कामे कुटुंबातील सदस्या प्रमाणे करीत आहेत.

दिवसभर शेतात राबल्यानंतर जानकर हे वाघमोडे कुटुंबासोबत जमिनीवर बसूनच जेवण करतात. गावातून शेतात जाण्यासाठी बैलगाडीचा वापर करतात. गावातील टपरीवर स्वत: चहा बनवून स्वत:ही पितात आणि इतरांनाही देतात, असे वाघमोडे यांनी सांगितलं. गेल्या ३६ दिवसांपासून ते आमच्या शेतात राबत आहेत. आम्ही त्यांना काम करण्यास मनाई करतो. पण मी शेतकऱ्याचाच मुलगा आहे, असं सांगत ते शेतात काम करतात. त्यामुळे आम्हाला त्यांना अडवता येत नाही, असे  परमेश्वर वाघमोडे यांनी सांगितलं. भाजपमध्येच काय, राजकारणात असं पहिल्यांदाच घडतय असे म्हंटले तर ते वावगे ठरणार नाही. जानकर यांचा दिवस पहाटे ५ वाजता सुरु होतो. सकाळी व्यायाम केल्यावर अध्यात्मिक ग्रंथांचे वाचन करतात. त्यानंतर शेतात काम करतात. टीव्ही बघत नाहीत, असे सांगतानाच एवढ्या दिवसात एकदाच बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांना भेटायला गेल्याचे जानकर यांनी सांगितले.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!