स्थैर्य, पांचगणी, दि. 23 : परिवहन मंत्री यांच्या आदेशानुसार आणि जिल्हाधिकारी यांच्या सूचनेनुसार महाबळेश्वर आगाराच्यावतीने महाबळेश्वर-वाई व महाबळेश्वर-सातारासाठी दिवसभरात एस. टी. बसच्या सुमारे 12 फेर्या सुरू असून त्याचा फायदा वाई, सातारा येथे उपचार घेणार्या रुग्णांना तसेच अत्यावश्यक कामानिमित्त जाणार्या स्थानिक प्रवाशांना होत आहे. कोरोना प्रतिबंधात्मक सर्व उपाययोजना करून चालक, वाहक, कर्मचारी व प्रवासी यांची विशेष काळजी घेतली जात आहे, अशी माहिती महाबळेश्वर आगाराचे व्यवस्थापक एन. एम. पतंगे यांनी दिली.
करोनाच्या प्रादुर्भावामुळे सर्वत्र लॉकडाउन असल्यामुळे महाबळेश्वरचे रस्ते गेल्या तीन महिन्यांपासून पर्यटकांसाठी बंद आहेत. बहुजन हिताय बहुजन सुखाय हे ब्रीदवाक्य असलेली एस. टी. बस सेवाही या काळात पूर्णपणे बंद होती. महाबळेश्वर शहरासह तालुक्याचा जवळ जवळ संपूर्ण भाग या काळात वेळीच काळजी घेऊन उपाययोजना केल्याने व दक्षता घेतल्याने बर्याच अंशी करोना मुक्त होता. अशीच काहीशी परिस्थिती जिल्ह्यात असल्या कारणाने सातारा जिल्हाधिकारी यांनी शासनाच्या आदेशानुसार जिल्हा अंतर्गत वाहतूक व अत्यावश्यक दळणवळणासाठी परवानगी दिली. त्यामुळे महाबळेश्वरवरून वाई व सातारा येथे जाणार्या प्रवाशांच्या सोयीसाठी एस. टी. आगाराने आपली बस सेवा वरील गावांना सरळ जा-ये करण्यासाठी सुरू केली आहे. महाबळेश्वर आगारामार्फत वाईसाठी साधारणपणे तासातासाने बससेवा सुरू असून दिवसातून 10 फेर्या मारल्या जातात तर सातारासाठी फक्त मेढामार्गे सकाळी 8.15 पासून सायंकाळी 6 वाजेपर्यंत 12 फेर्या मारल्या जातात. हे सर्व करत असताना कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना करून बस चालक, वाहक व प्रवाशांची संपूर्णपणे काळजी घेतली जाते. बस फेर्या सुरू होण्यापूर्वी व नंतर संपूर्ण बसचे सॅनिटायझेशन केले जाते. बसमधून एका वेळी केवळ 20 ते 22 प्रवाशांची ने-आण केली जाते. तोंडाला संरक्षकपट्टी वापरण्याचीही काळजी घेतली जाते. बसमध्ये कामावर असलेल्या चालकाच्या सुरक्षिततेसाठी चालकाच्या मागील बाजूचा प्रवाशांकडे जाणारा दरवाजा पारदर्शक शीटने बंद करण्यात आला असून चालकाला त्याच्या शेजारील पुढील बाजूच्या छोट्या दरवाज्यातूनच बसमध्ये ये-जा करावी लागत आहे. त्यामुळे प्रवाशांपासून त्याची व त्याच्यापासून प्रवाशांची काळजी घेतली जात आहे. दरम्यान, महाबळेश्वर आगाराने आपल्या बसमधून माल वाहतूक सेवाही सुरू केली आहे. त्याचा व्यापारी, नागरिकांनी जास्तीजास्त लाभ घ्यावा, असे आवाहन आगार व्यवस्थापक ए. एम. पतंगे यांनी केले आहे.
महाबळेश्वरहून वाई व सातारकडे जाणार्या बसचे वेळापत्रकमहाबळेश्वर ते वाईसाठी सकाळी 7.30, 9.30 11.50, दुपारी 2.40 वाजता व सायंकाळी 6 वाजता बस आहे. वाई येथून महाबळेश्वरसाठी सकाळी 8 .30, 10.40, दुपारी 1.30, 4.10 व सायंकाळी 7.15 वाजता बस आहे. महाबळेश्वर येथून मेढा मार्गे सातारासाठी सकाळी 8.15, 10.15, दुपारी 12.30, 2.30, 4.30 व सायंकाळी 6 वाजता बस आहे. सातारा येथून महाबळेश्वरसाठी सकाळी 8.15, 10.15, दुपारी 12.30, 2.30, 4.15 व सायंकाळी 6.30 वाजता बस आहे.