मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना लुटणारी दुक्कल जेरबंद

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १४ नोव्हेंबर २०२२ । कराड । कराड शहर परिसरात मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना लुटणारी दुक्कल सक्रिय झाली होती. त्यांना जेरबंद करून तसेच त्यांच्याकडे दोन गुन्हे उघड करून तीन लाख दहा हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात कराड शहर पोलिसांना यश आले आहे.
अनिकेत राहुल वाडेकर राहणार सोमवार पेठ कराड आणि नागेश तायप्पा गायकवाड मंगळवार पेठ कराड अशी दोघा संशयितांची नावे आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक 15 ऑक्टोबर 2022 रोजी कल्याणी मारुती मंदिर ते चावडी जाणाऱ्या रस्त्यावर मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या एका ज्येष्ठ नागरिकास रस्त्यात खाली पाडून त्याच्या गळ्यातील सोन्याची चेन हिसडा मारून जबरी चोरी झाली होती. या घटनेत दोन अनोळखी इसमांवर कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता.

ही घटना पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास घडली होती. झालेला प्रकार उघडकीस आणणे पोलिसांसमोर आव्हान होते. पोलिसांनी संशयितांचे सीसीटीव्ही फुटेज प्राप्त केले. परंतु त्यामध्ये संशयितांनी चेहरा झाकण्याची आणि ओळख पटणार नसल्याची पूर्ण काळजी घेतली होती. त्यावरून त्यांची ओळख पटवणे आव्हानात्मक होते. परंतु गुन्ह्यात वापरलेल्या मोटर सायकलच्या वर्णनावरून गाडीचा शोध सुरू होता. आरोपींनी गुन्हा करतेवेळी वापरलेली मोटरसायकल रविवार पेठ, सोमवार पेठ, कृष्णा घाट परिसरात फिरत असल्याचीही माहिती मिळाली होती. या माहितीवर आधारित तपास करून संबंधित दोन्ही आरोपींना मोटरसायकल सह 9 नोव्हेंबर रोजी अटक केली होती.

पोलीस कस्टडी दरम्यान आरोपींकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी कराड शहरातील रविवार पेठ येथील जैन मंदिरासमोर दुसरा एक गुन्हा केल्याचे कबूल केले. या गुन्ह्याचे तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक राजू डांगे यांनी आरोपींकडे कौशल्यपूर्वक तपास करून दोन्ही गुन्ह्यातील चोरीस गेलेल्या साडेचार तोळे वजनाच्या सोन्याच्या चैनी तसेच गुन्हा करताना वापरलेली मोपेड मोटरसायकल असा एकूण 3 लाख 10 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक राजू डांगे करीत आहेत.
ही कामगिरी पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक बापू बांगर, कराडचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. रणजीत पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि अमित बाबर, पोलीस उपनिरीक्षक राजू डांगे, सहाय्यक फौजदार सतीश जाधव, रघुवीर देसाई, नितीन येळवे, जयसिंग राजगे, संजय जाधव, प्रफुल्ल गाडे, आनंदा जाधव, महेश शिंदे, संतोष लोहार, रईस सय्यद, सोनाली मोहिते यांनी केली आहे.

पोलिसांकडून आवाहन
पोलिसांनी आवाहन केले आहे की, मॉर्निंग वॉक करता बाहेर पडणाऱ्या इसमांनी मौल्यवान दागिने वापरू नयेत तसेच स्वतःचा चेहरा लपवणारे मोटर सायकलस्वार आजूबाजूला फिरत असल्यास योग्य ती सावधगिरी बाळगावी. कोणताही अनुचित प्रकार घडल्यास तात्काळ पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा.


Back to top button
Don`t copy text!