स्थैर्य, सातारा, दि.१७: कोरोनाच्या सावटातही सातारा शहरात पारंपारिक पध्दतीने पण अत्यंत साधेपणाने नवरात्रौत्सवाला शनिवार पासून सुरवात झाली. सार्वजनिक दुर्गा मंडळांनी आदिशक्तीची मिरवणूक टाळून साधेपणाने उत्सव साजरा करण्यावर भर दिला आहे. दरम्यान, घरोघरी घटस्थापना करण्यात आली. पहिली पानांची माळ असते परंतु, पान विक्रेत्यांकडे खाऊची पानेच उपलब्ध नसल्याने नागरिकांची बरीच धावपळ झाली.
कोरोनाचे सावट आणि उत्सव साजरे करण्यावर काहीशी बंधने असली तरीही आदिमाया आदिशक्ती देवी भगवतीचा उत्सव नागरिक तेवढ्याच उत्साहात पण साधेपणाने साजरा करण्यात आला. मात्र, उत्सवाचा जो माहौल असतो तो यंदा दिसणार नसल्याने गरबा प्रायोजकांच्या उत्सवावर पाणी पडले आहे. शनिवारी (ता. 17) घटस्थापनेने या नवरात्र उत्सवास प्रारंभ झाला सातार्यात घरोघरी दिवसभर घटस्थापनेची लगबग सुरू होती. दरम्यान, घटस्थापनेसाठी लागणारे मातीचे घट, धान्य, वावरीसह खाऊची पानेही खरेदीसाठी बाजारपेठेत नागरिकांची वर्दळ राजवाडा परिसर व मोती चौकात वाढली होती.
नवरात्रोत्सव हा महिलांसह युवक-युवतींचा जिव्हाळ्याचा सण. मात्र, या वर्षी करोना विषाणूच्या सावटामुळे हा सणही नागरिकांना साधेपणाने साजरा करावा लागत आहे. शनिवारी घटस्थापना असून, त्यासाठी लागणारे मातीचे घट राजवाडा परिसरात तसेच पोवई नाका परिसरात कुंभार कलाकारांनी विक्रीसाठी मांडले होते. त्याचे दर साधारण 30 ते 50 रुपयांपर्यंत होते. घटासाठी लागणारी वावरी (शेतातील माती) तसेच खाऊची पाने आणि धान्यही विक्रीसाठी आले होते त्यांच्या खरेदीसाठी महिलांची वर्दळ वाढली होती. मात्र, गेल्या काही दिवस झालेल्या जोरदार पावसामुळे खाऊची पानांचा माल खराब झाल्याने आदल्या दिवशीपासूनच खाऊच्या मालाची विक्रेत्यांजवळ कमतरता जाणवत होती. ऐन घटस्थापनेदिवशी अनेक नागरिक पान विक्रेत्यांकडे विचारणा करत होते. मात्र, पाने उपलब्ध होत नव्हती.
महिला, मुलींसह अनेक नागरिक या नवरात्रात उपवास करतात. काहीजण एकवेळ भोजन करतात तर अनेक महिला नऊ दिवस केवळ फलाहार घेतात. यामुळे या उत्सवात फळांचे दर हमखास वाढतात. सध्या केळी 30 ते 50 रुपये डझन, तर सफरचंद प्रतीप्रमाणे 120 ते 200 रुपये किलो दराने विकली जात आहेत. खजूर 80 ते 300 रुपये किलो आहे. यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.
शहरातील सार्वजनिक दुर्गा मंडळांनी सुध्दा नवरात्राचा उत्सवी बाज आटोपता घेतला. मोती चौकातील श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह मंडळाने पारंपारिक मोती चौकाची जागा सोडून लंबे बोळाच्या नजीक असणार्या टोपे वाडयात चार फूट उंचीच्या देवीची प्रतिष्ठापना केली आहे. सार्वजनिक ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी देवीच्या दर्शनाची ऑनलाईन सोय करण्यात आल्याचे मंडळ कार्यकारीणी सदस्य श्याम इंगवले यांनी सांगितले. सम्राट मित्र मंडळ सदाशिव पेठ, भारतमाता मित्र मंडळ सदर बझार या मंडळांनी सुध्दा बंदिस्त जागेत देवीची प्रतिष्ठापना करून भाविकांची फार गर्दी होणार नाही याची काळजी घेतली आहे.