स्थैर्य, औंध, दि. १८: येळीव ता.खटाव येथील ग्रामपंचायत ,ग्रामस्थ ,युवक यांच्या अथक प्रयत्नांनंतर मागील एक महिन्यापासून कोरोनाच्या विळख्यात सापडलेले गाव कोरोनामुक्त झाले असून गावातील 32रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
येळीव गावात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन तालुका वैद्यकीय अधिकारी, गटविकास अधिकारी, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ, युवक यांनी तात्काळ उपाययोजना करून संपूर्ण येळीव गावात औषध फवारणी केली त्याचबरोबर प्रत्येक कुटुंबाचे ट्रेसिंग, टेस्टींग,ट्रिटमेंट या त्रिसुत्रीवर भर दिला त्यामध्ये गावातील 32 रुग्ण हे कोरोनामुक्त झाले आहेत. ग्रामस्थांनी केलेल्या अथक प्रयत्नांनंतर येळीव गाव हे सध्या पूर्णपणे कोरोनामुक्त झाले आहे.
याकामी ग्रामपंचायतीचे सर्व पदाधिकारी, ग्रामसेवक, तलाठी, आरोग्य विभागाचे कर्मचारी ,आशा व अंगणवाडी सेविका यांनी परिश्रम घेतले आहेत. कोरोनाचा वारंवार होणारा प्रादुर्भाव रोखण्यासाठी येळीव ग्रामस्थ आता सजगतेने कार्यवाही करत असून प्रत्येकजण शासनाने घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्वांचा कार्यप्रणालीचा अवलंब करीत आहेत.