
दैनिक स्थैर्य । दि. ०१ जुलै २०२२ । सातारा । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर महाराष्ट्रामध्ये भाजपने सत्तास्थापनेच्या हालचाली सुरू केल्या आहेत या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर खासदार उदयनराजे भोसले आपल्या समर्थकांसह शुक्रवारी तातडीने मुंबईला रवाना झाले त्यांच्यासमवेत माजी जिल्हा परिषद सदस्य सुनील काटकर काका धुमाळ पंकज चव्हाण जितेंद्र खानविलकर संदीप शिंदे इत्यादी उपस्थित होते या दौर्यात उदयनराजे भोसले यांनी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
भाजपच्या महाराष्ट्रात सत्तास्थापनेच्या हालचाली सुरू झाल्यानंतर सातारा जिल्ह्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीत सामील झालेले आमदार शंभूराज देसाई कोरेगावचे आमदार महेश शिंदे याशिवाय भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले व माण चे आमदार जयकुमार गोरे यांच्या मंत्री पदाविषयीच्या चर्चा सुरू झाल्या आहेत सत्तास्थापनेसाठी फडणवीसांनी राज्यपालांना ई-मेलद्वारे पत्र दिले आहे त्यामुळे एकूणच महाराष्ट्राच्या राजकारणात सत्तांतराचा दुसरा अंक सुरू झाला आहे.
या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर खासदार उदयनराजे भोसले शुक्रवारी सकाळीच आपल्या निवडक समर्थकांसह मुंबईला रवाना झाले मुंबई त्यांनी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली भेट त्यांच्या सागर येथील बंगल्यावर झाली यावेळी त्यांची विविध विषयांवर चर्चा सुद्धा झाली गेल्या आठ दिवसातील उदयनराजे व देवेंद्र फडणवीस यांची ही दुसरी भेट आहे फडणवीसांनी ज्या चतुराईने राजकीय खेळ्यांची मुत्सद्देगिरी दाखवत अडीच वर्षानंतर भाजपचा सत्तास्थापनेसाठी दावा केला त्यांच्या या मुत्सद्देगिरीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी शाल पांघरून व पुष्पगुच्छ देऊन विशेष कौतुक केले यावेळी त्यांनी देवेंद्रजी फडणवीस यांच्याशी विविध विषयांवर चर्चा केली स्थानिक स्वराज्य संस्था व सातारा जिल्हा परिषद निवडणुका याशिवाय सातारा जिल्ह्यातील विकासकामांच्या विविध प्रश्नांवर त्यांनी फडणवीस यांच्याशी चर्चा केल्याची माहिती आहे.