दैनिक स्थैर्य । दि. २४ जून २०२३ । फलटण ।
उन्हाची वाढती तीव्रता, हवेतील आर्द्रतेचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन संत शिरोमणी ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहोळ्याचे नियोजन करताना पिण्याचे पाणी, निवारा यासह नेहमीच्या पद्धतीने वीज, पाणी, रस्ते, आरोग्य, सुरक्षीतता वगैरे बाबींचे उत्तम नियोजन आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी झाल्याने तीव्र उन्हामुळे निर्माण झालेल्या अत्यंत कठीण परिस्थितीतही सोहोळा आनंदी, उत्साही वातावरणात निर्विघ्नपणे पार पाडण्यात प्रशासन यशस्वी झाले आहे. निश्चित सर्व अधिकारी, कर्मचारी यांचे अभिनंदन !
जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, जिल्हा पोलिस प्रमुख समीर शेख, अतिरिक्त जिल्हा पोलिस प्रमुख बापू बांगर, जिल्हा परिषद प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी यांच्या मार्गदर्शनाखाली फलटणचे प्रांताधिकारी सचिन ढोले, उपजिल्हाधिकारी तथा नोडल ऑफिसर डॉ. शिवाजीराव जगताप, उप विभागीय पोलिस अधिकारी राहुल धस, तहसीलदार अभिजित जाधव, नगर परिषद प्रशासक तथा मुख्याधिकारी संजय गायकवाड, सार्वजनिक बांधकाम खात्याचे उप विभागीय अभियंता मोहन खोसे, ग्रामीण पोलिस ठाण्याचे प्रभारी पोलिस निरीक्षक धन्यकुमार गोडसे, शहर पोलिस ठाण्याचे प्रभारी पोलिस निरीक्षक शंकर पाटील यांच्यासह महसूल, जिल्हा परिषद, पोलिस, पाणी पुरवठा, स्वच्छता, आरोग्य, वीज वितरण, पुरवठा, सार्वजनिक बांधकाम विभागातील अन्य अधिकारी, कर्मचारी आणि मुख्यतः फलटण नगर परिषदेचे सर्व अधिकारी कर्मचारी यांनी सोहोळा सातारा जिल्ह्यात आल्या पासून येथील मुक्काम, विसावा वगैरे सर्व ठिकाणांचे संपूर्ण नियोजन उत्तम केले आणि त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी अत्यंत काटेकोर करुन घेतल्याने सोहोळा अत्यंत उत्साहात आनंदी वातावरणात कोणतीही त्रुटी न राहता, कसलाही कटू प्रसंग न येता उत्तम प्रकारे संपन्न झाला.
उन्हाची वाढती तीव्रता आणि हवेतील वाढत्या आद्रतेच्या प्रमाणामुळे पिण्याच्या पाण्याची अधिक आवश्यकता लक्षात घेऊन प्रशासनाने तरडगाव ते बरड दरम्यान नेहमीच्या व्यवस्थेतील शासकीय टँकर आणि त्यांचे फिलिंग पॉईंट तसेच दिंडीकऱ्यांचे सुमारे ४५० ते ५०० टँकर भरण्यासाठी फिलिंग पॉईंट आणि स्वच्छ, शुद्ध पुरेशा पाण्याची व्यवस्था तर केली होतीच त्याशिवाय या संपूर्ण मार्गावर प्रत्येकी १५ ते १८ हजार लिटर क्षमतेचे ८ ते १० टँकर्स त्यांना १६ फिक्स पॉईंट ठरवून देवून तेथून अखंडित पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करतील अशी व्यवस्था प्रशासनाने केल्याने पिण्याच्या पाण्याची मुबलक उपलब्धता करुन देणे शक्य झाले, फलटण शहरातही नेहमीच्या व्यवस्थेशिवाय शहरात विविध ठिकाणी कॉक लावून १ हजार लिटर क्षमतेच्या टाक्या ठेवून पिण्याच्या पाण्याचा जादा पुरवठा करण्यात आला.
पोलिस प्रशासनाने अत्यंत चोख पोलिस बंदोबस्त ठेवल्याने कोठेही कायदा सुव्यवस्थेचा, वाहतूक ठप्प झाल्याचा, महिलांचे दागिणे लंबविण्याचा, चोरीचा प्रयत्न झाल्याचे समोर आले नाही. आरोग्य विभागाने खास पथके नियुक्त करुन वैद्यकिय उपचार, मोफत औषधे तातडीने उपलब्ध होतील याची व्यवस्था केल्याने त्याबाबतही तक्रार आली नाही.
फलटण येथे नेहमी प्रमाणे नगर परिषदेने पुरेशी शौचालये, स्नानगृह उपलब्ध करुन दिली, त्याचबरोबर शासनाने जादा १५०० शौचालये उपलब्ध करुन देताना तेथे पुरेसे पाणी व स्वछतेची व्यवस्था केली होती.
आळंदी – पंढरपूर पालखी महामार्गाचे काम सुरु असल्याने सोहोळा मार्गक्रमण करताना अडचणी येतील, अडथळे होतील अशी भिती व्यक्त करण्यात येत होती, मात्र केंद्रीय रस्ते वाहतूक विभागाचे अधिकारी, सबंधीत ठेकेदार यांनी अत्यंत उत्तम व्यवस्था केल्याने कसलीही अडचण जाणवली नसल्याचे स्पष्ट झाले आहे.