विडणी ता. फलटण येथे सचिन अभंग, विशाल शिंदे वगैरे पुष्पहार घालुन अभिवादन करताना. |
स्थैर्य, फलटण : करोना वाढता प्रादुर्भाव नियंत्रणासाठी लावण्यात आलेल्या लॉक डाऊनमुळे संत शिरोमणी सावतामाळी महाराज यांच्या 725 व्या संजीवन समाधी सोहळा दिनानिमित्त प्रतिवर्षी आयोजित करण्यात येत असलेले किर्तन, प्रवचन, भजन व सप्ताह समाप्तीदिवशी संत शिरोमणी सावता महाराज प्रतिमा मिरवणूक वगैरे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आल्याने भाविक भक्त मंडळींची सर्वत्र मोठी कुचंबना झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
त्या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी संत शिरोमणी सावता महाराजांच्या प्रतिमा ठेवून मर्यादित स्वरुपात पुष्पहार घालुन अभिवादन करण्यात आले. म. फुले युवक संघटना, विडणी ता. फलटणचे अध्यक्ष सचिन अभंग, संभाजी ब्रिगेड सातारा जिल्हाध्यक्ष विशाल शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत विडणी येथे संत शिरोमणी सावतामाळी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालुन अभिवादन करण्यात आले. यावेळी सनी कर्णे, अनिल जगताप, पंकज शिंदे, सुबोध शिर्के, संकेत शिर्के व सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
अ. भा. समता परिषद व महाराष्ट्र माळी समाज महासंघाचे पदाधिकारी दशरथ फुले यांनी आसू येथे, बाळासाहेब ननावरे यांनी फलटण व धुळदेव येथे, दत्तोपंत शिंदे, दादासाहेब शेंडे, डॉ. विजयराव बोरावके, डॉ. बाळासाहेब शेंडे वगैरेंनी फलटण येथे तर अन्य पदाधिकाऱ्यांनी आपल्या गावातील सावता मंदिर अथवा विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पुष्पहार घालुन अभिवादन केले.
फलटण येथील संत शिरोमणी सावता महाराज मंदिरात नित्य पूजा झाल्यानंतर पुष्पहार घालुन अभिवादन करण्यात आले, त्याप्रमाणे तालुक्यातील अनेक गावांत साध्या पद्धतीने, सर्व नियम निकष सांभाळून भक्ती भावाने संत शिरोमणी सावता महाराज संजीवन समाधी सोहळा दिनानिमित्त कार्यक्रम संपन्न झाले.