
फलटण कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे शेतकऱ्यांना मार्गदर्शन; बँक ऑफ बडोदाच्या सहकार्याने कर्ज अर्ज भरण्याचे दिले प्रात्यक्षिक.
स्थैर्य, फलटण, दि. २५ डिसेंबर : दुधेबावी (ता. फलटण) येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी संलग्न आणि फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित कृषी महाविद्यालय, फलटणच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त असा उपक्रम राबवला. ‘ग्रामीण जागरूकता कृषी कार्यानुभव व औद्योगिक जोड प्रकल्प २०२५-२६’ (RAWE) अंतर्गत कृषीदुतांनी शेतकऱ्यांना ‘किसान क्रेडिट कार्ड’ (KCC) आणि पीक कर्जाविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.
कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी दुधेबावी येथील सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. (SDCC) च्या शाखेला भेट दिली. यावेळी त्यांनी बँकेचे शाखाप्रमुख श्री. एस. एस. यादव आणि कर्मचाऱ्यांकडून शेतीविषयक विविध कर्ज योजनांची आणि पीक कर्ज योजनेची तांत्रिक माहिती जाणून घेतली.
केवळ माहिती घेऊन न थांबता, विद्यार्थ्यांनी उपस्थित शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्डचे महत्त्व पटवून दिले. तसेच, पीक कर्जासाठी अर्ज कसा करावा, फॉर्म कसा भरावा, यासाठी कोणती कागदपत्रे लागतात, याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक (Demonstration) शेतकऱ्यांना करून दाखवले. यामुळे शेतकऱ्यांच्या मनातील कर्जाविषयीच्या शंका दूर होण्यास मदत झाली.
विद्यार्थ्यांचा सहभाग
हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी कृषीदूत रामराजे कुलाळ, अभिषेक मोरे, ऋषिकेश ओंबासे, रोहित वाघमारे, झहीर मणेरी, श्रीराम मोहिते आणि प्रणव साळुंखे यांनी विशेष परिश्रम घेतले.
मान्यवरांचे मार्गदर्शन
सदर उपक्रम कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यू. डी. चव्हाण, श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर, कार्यक्रम समन्वयक प्रा. एन. एस. ढालपे, कार्यक्रम अधिकारी प्रा. एस. एम. साळुंखे, प्रा. एन. ए. पंडित आणि प्रा. जी. बी. अडसूळ यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आला.
यावेळी शाखाप्रमुख एस. एस. यादव, बँक कर्मचारी आणि परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

