जिल्ह्यातील पर्यटनस्थळांवर शुकशुकाट


दैनिक स्थैर्य । 28 जून 2025 । सातारा । जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी प्रथम दिलेल्या पर्यटन निबंधाच्या आदेशाचा विपर्यास होऊन पर्यटकांवर त्याचा परिणाम झाला आहे. त्यामुळे सुमारे 60 टक्के पर्यटकांनी पर्यटनस्थळांकडे पाठ फिरवली असल्याचे चित्र सध्या जिल्ह्यातील पर्यटनस्थळांवर दिसून येत आहे. शासकीय अध्यादेशात निबंध उल्लेख असताना त्याचा अर्थ बंद असा लावण्यात आल्याने पावसाळी पर्यटनावर पाणी फेरले गेले आहे.

जिल्ह्यावर निसर्गाची मोठी कृपा आहे. निसर्गाची मुक्तहस्ते उधळण याठिकाणी पाहावयास मिळते. डोंगर, किल्ले, ठोसेघर वजराईचे धबधबे, सडा वाघापूरचा उलटा धबधबा, महाबळेश्वर, पाचगणी, वर्ल्ड हेरिटेज असलेले कास पुष्प पठार अशा एकापेक्षा एक सरस स्थळांसाठी सातारा जिल्हा प्रसिद्ध आहे. त्यामुळे साहजिकच देश-विदेशातील पर्यटक पर्यटनासाठी सातारा जिल्ह्याला पसंती देतात. हेच पर्यटन शेकडो परिवारांच्या उदरनिर्वाहाचे साधन बनले आहे. हजारो पर्यटक पर्यटनस्थळी आल्याने स्थानिकांना रोजगार मिळून जातो. त्या त्या परिसरातील पिके, खाद्यपदार्थ मोठ्या प्रमाणावर विकले जातात. त्यामुळे स्थानिकांच्याही घरची चूल पेटते.

पावसाळी पर्यटनाची काही आगळीच मजा असते. खास पावसाळी पर्यटनासाठी सहलींचे आयोजन करण्यात येते. त्यातल्या त्यात महाबळेश्वर-पाचगणी-कोयना परिसरासह ठोसेघर, वजराई धबधबा, सडा वाघापूरचा उलटा धबधबा पाहण्यासाठी आबालवृद्धांची तुफान गर्दी होत असते. धबधब्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने विचार केला तर ठोसेघर संयुक्त वनव्यवस्थापन समितीच्या माध्यमातून ठोसेघरला पर्यटकांच्या सुरक्षेला

प्रथम प्राधान्य देण्यात येते, असे दिसून येते. पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी ठिकठिकाणी गार्डस्, सीसीटीव्हीचा वॉच, पर्यटन गॅलरी, महिलांसाठी चेंजिंग रुम, टॉयलेट बाथरुम, आराम करण्यासाठी प्रशस्त हॉल, मद्य प्राशन केलेल्या पर्यटकांना प्रवेश बंदी, धबधब्याचे नयनरम्य मनमोहक दृश्य पाहण्यासाठी प्रेक्षक गॅलरी अशा नानाविध उपाययोजना ठोसेघर संयुक्त वनव्यवस्थापन समितीने राबविलेल्या आहेत. संतोष पाटील यांनी दि. 19 जून रोजी पर्यटकांवर निर्बंध राहवेत म्हणून एक आदेश काढला. या आदेशामध्ये केवळ पर्यटकांनी सुरक्षितरित्या पर्यटनस्थळांचा आनंद लुटावा याबाबत काही अटी घालून दिल्या होत्या. हे आदेश 20 जून ते 19 ऑगस्टपर्यंत लागू करण्यात आले होते. मात्र, समाजमाध्यमांवर प्रसिद्ध झालेल्या या बातम्यांमधून पर्यटकांनी पर्यटन बंदी’ हा शब्द उचलला. त्यामुळे साहजिकच त्याचा परिणाम पर्यटनावर झाला. पर्यटनस्थळांवरच बंदी घातली आहे, असे समजून पर्यटक पर्यटनस्थळी फिरकेनासे झाले. त्यामुळे उन्हाळी आणि वर्षा पर्यटनामुळे ज्यांची हातावरची पोटे भरत होती, त्यांच्या उपजिवीकेवर संक्रांत आली.

पर्यटकच नाहीत तर खाद्यपदार्थाचा आस्वाद घेणार कोण, यामुळे काही जणाच्या चुली पेटेना झाल्यात. यानंतर दि. 20 रोजी जिल्हाधिकारी यांनी खास बैठक घेऊन पुन्हा आदेश जारी केले. त्यानुसार पर्यटनावर बंदी नाही, फक्त सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून पर्यटन करा, असे म्हटले आहे. या आदेशामुळे जिल्ह्यातील पर्यटन पुन्हा बहरेल आणि पुन्हा पर्यटकांची पावले पर्यटनस्थळांकडे वळतील, अशी अपेक्षा होती, ती मात्र फोल ठरली आहे.


Back to top button
Don`t copy text!