
स्थैर्य, मुंबई, दि.२७: अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात ड्रग्ज अँगल समोर आल्यानंतर आता यात सुशांतचेच नाव अडकत चालले आहे. परिस्थिती अशी आहे की, रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शोविक यांच्यापेक्षा आता सुशांतवर अधिक प्रश्न उपस्थित होत आहेत. कदाचित याच कारणास्तव दिवंगत अभिनेत्याचे कुटुंबीय एनसीबीच्या तपासावर समाधानी नाहीत आणि त्याबाबत ते प्रश्न विचारत आहेत. रिया चक्रवर्तीनंतर शनिवारी सारा अली खान आणि श्रद्धा कपूर यांनीदेखील सुशांत ड्रग्ज घेत असल्याचे एनसीबीला सांगितले.
साराने सुशांतसोबतच्या नात्याची दिली कबुली
एबीपी न्यूजच्या वृत्तानुसार, सारा अली खानने एनसीबीच्या चौकशीत कबूल केले की, 2018 मध्ये ती सुशांत सिंह राजपूतसोबत रिलेशनशिपमध्ये होती. साराच्या म्हणण्यानुसार ‘केदारनाथ’च्या शूटिंगदरम्यान दोघांचे अफेअर सुरू झाले होते.
साराने सांगितले की, चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान ती सुशांतच्या कॅपरी हाऊस येथील घरी त्याच्यासोबत राहायला गेली होती. याशिवाय ती आणि सुशांत पाच दिवस थायलंडच्या समुई बेटावर गेले असल्याचेही तिने सांगितले.
स्वतः ड्रग्ज घेत असल्याचे नाकारले
साराने कबूल केले की, सुशांत ‘केदारनाथ’च्या शूटिंग दरम्यान ड्रग्ज घेत असे. सुशांतसोबत पार्ट्यांमध्ये सहभागी होत असल्याचेही तिने मान्य केले. मात्र स्वतः कधीही ड्रग्जचे सेवन केले नसल्याचे तिने म्हटले आहे. आता सुशांतने केदारनाथ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान ड्रग्ज घ्यायला सुरुवात केली होती की आधीपासून तो ड्रग्ज घ्यायचा हे अद्याप स्पष्ट झाले नाही.
श्रद्धा म्हणाली – सुशांत व्हॅनिटी व्हॅनमध्ये ड्रग्ज घेताना दिसला होता
एनसीबीच्या चौकशीत श्रद्धा कपूर म्हणाली की, ‘छिछोरे’ चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान तिने सुशांतला व्हॅनिटी व्हॅनमध्ये ड्रग्ज घेताना पाहिले होते. या चित्रपटाच्या सक्सेस पार्टीसाठी ती पावना तलावाच्या काठी असलेल्या सुशांतच्या फार्महाऊसवर गेली होती, असेही श्रद्धा म्हणाली. या पार्टीत ड्रग्जचा वापर झाला होता, मात्र स्वतः कधीही ड्रग्जचे सेवन केले नसल्याचे श्रद्धाने एनसीबीला सांगितले.